राज्यातील दीड हजार शाळा आदर्श करण्याचा मानस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शाळा आदर्श करण्याचा मानस राज्य सरकारने व्यक्त केला आहे. यासाठी आगामी चार वर्षांत प्रत्येक तालुक्‍यातील किमान चार याप्रमाणे राज्यात एकूण १५०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. 

पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शाळा आदर्श करण्याचा मानस राज्य सरकारने व्यक्त केला आहे. यासाठी आगामी चार वर्षांत प्रत्येक तालुक्‍यातील किमान चार याप्रमाणे राज्यात एकूण १५०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अर्थसंकल्पात शासकीय शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधांसह गुणवत्तावाढीसाठी उत्कृष्ट अध्ययन सुविधा, स्मार्ट क्‍लासरूम, सुसज्ज वाचनालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा, इंटरनेट जोडणी, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी अंदाजे ५ हजार कोटी रुपयांचा बाह्यसहाय्यित प्रकल्प राबवण्याचे सरकारने ठरवले आहे. 

सीमावर्ती भागातील शाळांना आर्थिक साह्य 
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात सुरू असलेल्या मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्यासाठी सरकारने आर्थिक साह्य दिले आहे. यासाठी विशेष बाब म्हणून १० कोटी रुपये अर्थसाह्य जाहीर करण्यात आले.

कोरेगाव भीमा प्रकरण : आरोपी नवलखा, तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा!

महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना 
राज्यातील किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना कार्यान्वित करण्याचे सरकारने ठरवले आहे. या योजनेनुसार, पाच वर्षांत दहा लाख तरुण प्रशिक्षित होणार आहेत. ही योजना २१ ते २८ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी लागू करण्यात येईल. या योजनेसाठी ६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. १५ ऑगस्टपासून ही योजना सुरू होईल. 

आयटीआयचे कौशल्य केंद्रात रूपांतर
राज्यातील आयटीआयच्या दर्जात वाढ करून जागतिक दर्जाच्या आधुनिक कौशल्य केंद्रात रूपांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी क्षेत्रातून १२ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून राज्य सरकारकडून आगामी ३ वर्षांत १ हजार ५०० कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अर्थसंकल्पावर भाजप आमदार मिसाळ म्हणाल्या...

पुण्यात क्रीडा विद्यापीठ, ऑलिंपिक भवन बांधणार 
सोशल मीडियावर रमलेल्या तरुणांना मैदानात आणण्याचा निश्चय महाविकास आघाडीने केला असून, त्यासाठी त्यांनी मुख्य केंद्र म्हणून पुण्याची निवड केली आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, पुण्यामध्ये ऑलिंपिक भवन आणि मिनी ऑलिंपिकचे नियोजन केले जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

राज्यातील तरुणांनी मैदानाकडे वळावे यासाठी जाणीवपूर्वक महाआघाडी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया मंत्री सुनील केदार यांनी ‘सकाळ’कडे व्यक्‍त केली. पुण्याला खेळाची संस्कृती असल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ तिथे निर्माण केले जाईल. विविध खेळाच्या प्रशिक्षणासोबत त्यामुळे क्रीडा फिजियो, क्रीडा सायकॉलॉजी आदी सगळ्या विषयांवर अभ्यास येथे केला जाईल. क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी याचे नियोजन केले जाणार असल्याचे केदार यांनी सांगितले. राज्यात मिनी ऑलिंपिकदेखील भरवले जाणार असून, या स्पर्धांचा दर्जा आंतरराष्ट्रीय असावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार असल्याचेही केदार यांनी सांगितले.  

तालुका क्रीडा संकुलाचे अनुदान 1 कोटीवरून 5 कोटी करण्यात आले आहे. तर जिल्हा क्रीडा संकुलासाठी यापूर्वी 8 कोटी रुपये दिले जात ते यापुढे 25 कोटी दिले जाणार आहेत. विभागीय क्रीडा संकुलासाठी यापूर्वी 24 कोटीवरून 50 कोटी दिले जाणार आहेत. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंचा सहभाग वाढावा यासाठी राज्यातील उत्तम खेळाडूंची निवड करून त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन व भारतीय फुटबॉल फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या नवी मुंबई येथे होणाऱ्या ज्युनियर विश्‍वचषक स्पर्धेसाठी अनुदानाची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्‌डी व व्हॉलिबॉल स्पर्धा, स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा व कै. भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेसाठीचे अनुदान 50 लाखांवरून 75 लाख रुपये दिले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MahaBudget 2020 Maharashtra State 1500 schools intend to be ideal