
पुनर्विकास प्रकल्पांसह इतर गृहप्रकल्पांमध्ये मराठी माणसाला प्राधान्यानं घर मिळावं, त्यासाठी ४० टक्केची अट टाकून कायदा आणावा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली. सरकार यासाठी कायदा करणार का? मराठी माणसाला न्याय मिळणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. विधानपरिषदेत या प्रश्नाला राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं. शंभुराज देसाई हे उत्तर देत असताना मोठा गोंधळ झाला. अनिल परब यांनी शंभुराज देसाई यांना गद्दार म्हटल्यानं वातावरण तापलं. यानंतर देसाई यांनी थेट परब यांना तू बाहेर ये तुला दाखवतो अशी भाषा वापरली. यामुळे सभागृहाचं कामगाज दहा मिनिटं तहकूब करण्यात आलं.