
विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नाना पटोले यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आज विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज भरला आहे.
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची परीक्षा विधानसभेत होणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नाना पटोले यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आज विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते.
त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, ''विधानसभा अध्यक्ष आमचाच होईल. तसेच हे सरकार शेतकरी, मजूर, कामगार, नोकरदार वर्गासाठी काम करेल. त्याच प्रमाणे माझी भूमिका देखील शेतकरी हितासाठीच असेल.''
महाविकास आघाडीने एकमताने नाना पटोले यांची निवड केली आहे. तर नाना पटोले यांच्याविरोधात भाजपाकडून किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी भाजपाने हंगामी विधानसभा अध्यक्ष बदलण्यावरुन महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
प्रथा परंपरेनुसार हंगामी अध्यक्षपद कालिदास कोळंबकर यांना देण्यात आलं असताना त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. हे सरकार नियमबाह्य पद्धतीने सुरु आहे. मात्र हंगामी अध्यक्ष बदलण्याचा अधिकार सरकारला असतो असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नाना पटोले यांच्यानिमित्ताने विधानसभेला अनुभवी अध्यक्ष मिळाले आहेत.
मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''चार वेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून त्यांना अनुभव आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर झाली आहे.''
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ''भंडाऱ्याचे सुपुत्र नाना पटोले यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी दिलं आहे त्याचा विशेष आनंद आहे. वैयक्तिकरित्या ते माझ्या जिल्ह्यातून येतात. माझे छोटे बंधू आहेत. गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी नेहमी त्यांनी काम केले आहे. विधानसभेचे कामकाज चांगल्या रितीने ते हाताळतील असा विश्वास आहे.''
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ''देशातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होणार आहे. नाना पटोले या पदावर उत्तम काम करतील असा विश्वास आहे.''