पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचेय - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

सावंतवाडी - माणसाला यशस्वी होण्यासाठी महत्त्वाकांक्षा बाळगण्यास हरकत नाही. भविष्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनायची माझी इच्छा आहे, अशी भावना काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केली.

नुसते मेसेज पाठविण्यासाठी मोबाइलचा उपयोग नको तर तंत्रज्ञान आणि आधुनिक शिक्षण घेण्यासाठी येथील युवकांनी पुढाकार घ्यावा. तरच या स्पर्धेच्या युगात टिकाव लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

सावंतवाडी - माणसाला यशस्वी होण्यासाठी महत्त्वाकांक्षा बाळगण्यास हरकत नाही. भविष्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनायची माझी इच्छा आहे, अशी भावना काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केली.

नुसते मेसेज पाठविण्यासाठी मोबाइलचा उपयोग नको तर तंत्रज्ञान आणि आधुनिक शिक्षण घेण्यासाठी येथील युवकांनी पुढाकार घ्यावा. तरच या स्पर्धेच्या युगात टिकाव लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेतर्फे येथील बॅ. नाथ पै सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्‌घाटन श्री. राणे यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद शिक्षण सभापती आत्माराम पालयेकर, पंचायत समिती सदस्य प्रमोद सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, डॉ. जयेंद्र परुळेकर, गुरू पेडणेकर, मोहन भोई, रणजित देसाई, रंगराव काळे, शिवाजी देसाई, नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. राणे म्हणाले, ‘‘गरिबीत जन्माला आलो तरी मोठी स्वप्ने बघण्यास काहीही गैर नाही. मीसुद्धा मध्यम कुटुंबात जन्माला आलो. माझे वडील मिल कामगार होते. रस्त्याने शाळेत जाताना एखादी गाडी बाजूला गेल्यानंतर ही गाडी माझ्याकडे असावी, असे मला वाटत असे. त्यातून माझी महत्त्वाकांक्षा वाढत गेली. त्यात परिश्रम आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर मी नगरसेवकापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व महत्त्वाची पदे भोगली. यापुढेही मी पुन्हा मुख्यमंत्री बनेन, अशी माझी महत्त्वाकांक्षा आहे.

या ठिकाणी स्पर्धा परीक्षांना बसणारी मुलांची संख्या अतिशय कमी आहे. हे चित्र बदलणे काळाची गरज आहे. आज आपल्याकडे मोबाइल आहे; मात्र त्याचा उपयोग केवळ मेसेज पाठविण्यासाठी न करता आधुनिक माहिती घेण्यासाठी करावा. टवाळखोर आणि रस्त्यावरून फिरणारा मवाली कोणीही बनू शकतो; मात्र एक चांगला अधिकारी बनण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे आहेत. बाहेर गेल्यानंतर आमच्या जिल्ह्यातला अधिकारी किंवा मोठी व्यक्ती झालेला माणूस भेटल्यानंतर मोठा आनंद वाटतो. भविष्यात याचा आदर्श नव्या पिढीने घेणे गरजेचे आहे. अन्यथा या स्पर्धात्मक युगात सहज असे काहीही नाही.’’

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभूगावकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील मुले स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घडली पाहिजेत. त्यासाठी आवश्‍यक असलेले काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले जात आहे. याचा फायदा येथील विद्यार्थ्यांनी घ्यावा. काँग्रेस नेते राणे मुख्यमंत्री होण्यापूर्वी जिल्ह्यातील एकही व्यक्ती आयपीएस किंवा आयएस नव्हता; मात्र आता ही संख्या वाढत आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. आपला जिल्हा साक्षर तसेच पर्यटन जिल्हा हा राणेंच्या काळातच होऊ शकला आणि स्वच्छ जिल्हा म्हणून आता राणेंच्या ताब्यात जिल्हा परिषद असताना बहुमान मिळाला. त्याचा आदर्श नव्या पिढीने घेणे गरजेचे आहे.’’ या वेळी शिक्षण सभापती पालयेकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ओटवणे येथील प्राथमिक शाळेच्या मुलांनी स्वागतगीत सादर केले. महेश पालव यांनी सूत्रसंचालन केले.

अधिकारी व्हा, पण सर्वसामान्यांसाठी
श्री. राणे म्हणाले,‘‘अधिकारी होण्यासाठी आज्ञाधारकपणा अंगात असावा लागतो. तरच तो अधिकारी यशस्वी होतो. अधिकारी व्हा, पण मुंबईतील मुंढेंसारखे नको. त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना व्हावा यासाठी प्रयत्न करा. उद्दामपणा नको.’’

इंजिनिअरिंग कॉलेज रागाने काढले 
राणे म्हणाले, ‘‘मी १९९९ मध्ये जेव्हा जिल्ह्यात आलो तेव्हा येथील एकही विद्यार्थी इंजिनिअर नव्हता. यामुळे आपल्या जिल्ह्यात इंजिनिअर घडावेत यासाठी रागाने इंजिनिअर कॉलेज काढले. आता मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणार आहे.’’

Web Title: Maharashtra Chief Minister again be that