ठरलं तर! प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय आठवडाभरात; पृथ्वीराज चव्हाणांचे सूतोवाच

सचिन शिंदे
Thursday, 7 January 2021

विधानसभेच्या सभापतिपदाबद्दल मला विचारणा झाली होती, असे पुन्हा एकदा सूतोवाच आमदार चव्हाण यांनी या वेळी गप्पा मारताना केले.

कऱ्हाड : कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत येत्या आठवडाभरात निर्णय होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी औपचारिक चर्चेवेळी दिली. पत्रकार दिनानिमित्त त्यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
 

ते म्हणाले, ""प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सध्या ती जबाबदारी आहे. मात्र, श्री. थोरात मंत्रिमंडळातीलही महत्त्वाच्या पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी असल्याने त्या दृष्टीने पक्षाने त्यांच्या पदाबाबत विचारविनिमय सुरू केला आहे. पूर्वीपासून कॉंग्रेसमध्ये एक नेता एक पद या तत्त्वानेच काम सुरू आहे. त्यामुळे महसूलमंत्री थोरात यांच्याकडे विधानसभेतील गटनेते, प्रदेशाध्यक्षपद व मंत्री पद अशा जबाबदाऱ्या आहेत. एका कोणत्याही पदाला न्याय देता येत नाही, असा काहींचा सूर आहे. त्यामुळे त्या जबाबदारीचे विभाजन करावे का, या विषयाला धरून ती चर्चा सुरू झाली आहे. त्यामागे प्रदेशाध्यक्ष बदलावे, असा कोणताही हेतू नाही. मुंबईत प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत त्याबाबत बैठक झाली आहे. त्यांनीही त्याची सगळी माहिती घेतली आहे. त्या बैठकीत विविध अन्य विषयावरही चर्चा झाली आहे. त्यामुळे केवळ प्रदेशाध्यक्षपदावर चर्चा झालेली नाही, तरीही त्याबाबत येत्या आठवडाभरात योग्य तो निर्णय होण्याची शक्‍यता आहे.''

साताऱ्यातील प्रस्तावित चौपाटीवर मटकाबुकीचे राज्य; पोलिसांसह पालिकेचे दुर्लक्ष

सभापतिपदाबद्दल पुन्हा उच्चार

विधानसभेच्या सभापतिपदाबद्दल मला विचारणा झाली होती, असे पुन्हा एकदा सूतोवाच आमदार चव्हाण यांनी या वेळी गप्पा मारताना केले. ते म्हणाले, ""मतदारसंघात काम करण्यासाठी व्यापक वेळ देता यावा. अधिकाधिक विकास करता यावा, त्यासोबतच सक्रिय सकारात्मक राजकारण करता यावे, यासाठी मी त्या पदाचा इन्कार केला.''

आतली खबर : राजकारण्यांना ED ची चौकशी म्हटली की धडकी का भरते ?

संपादन - सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Congress Chief Will Elect Soon Says Prithviraj Chavan Political News