धक्कादायक:संत्री उत्पादनात महाराष्ट्र पिछाडीवर

orange
orange

नागपूर - फलोत्पादन विभागाने नुकतीच संत्र्याचे उत्पादन आणि उत्पादकताविषयक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये दशकभरापूर्वी संत्र्याच्या सर्वाधिक लागवड क्षेत्र आणि उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्राची दहाव्या स्थानी घसरण झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. 

देशातील १५ राज्यांमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. त्यातही कर्नाटक, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, पश्‍चिम बंगाल आणि महाराष्ट्र हे प्रमुख उत्पादक प्रदेश आहेत. २०१३-१४ मध्ये महाराष्ट्रात एकूण १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा लागवड होती. त्यातून सात लाख ४२ हजार पाचशे टन संत्र्याचे उत्पादन झाले. त्यानुसार राज्याची उत्पादकता ५.५० टन प्रति हेक्‍टर इतकी होती. २०१७-१८ मध्ये महाराष्ट्राची उत्पादकता ७.३ टन प्रति हेक्‍टरवर पोहोचली. गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्य या अत्यल्प संत्रा उत्पादकतेवर स्थिर आहे. याउलट पंजाब मध्ये संत्रा खालील क्षेत्र महाराष्ट्राच्या तुलनेत निम्मे आहे.   पंजाबमध्ये अवघ्या ४७ हजार १०० हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. किन्नो नावाने या भागातील संत्रा ओळखला जातो. त्याची उत्पादकता २३.४० टन प्रति हेक्‍टर इतकी आहे. परंतु किन्नोच्या तुलनेत चव आणि रंगाच्या बाबतीत नागपुरी संत्रा सरस आहे. लगतच्या मध्य प्रदेशने देखील संत्र्याखालील क्षेत्र वाढवताना उत्पादकतेच्या बाबतीत देखील आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशमध्ये ५२ हजार हेक्‍टरवर संत्रा बागा आहेत. त्यातून आठ लाख ९४ हजार टन उत्पादन झाले. त्यानुसार मध्य प्रदेशची उत्पादकता १७.३७ टन प्रति हेक्‍टर इतकी आहे. आसाम आणि राजस्थानमधील संत्रा लागवड क्षेत्र कमी असताना उत्पादन महाराष्ट्राच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. 

संत्र्याचे प्रति हेक्‍टरी उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपाययोजना शासनस्तरावरून करण्यात आल्या. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात दहा वर्षांमध्ये संत्री उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते ते साध्य होऊ शकले नाही. उलट उत्पादन कमी कमी होत गेले या अभियानात आदर्श रोपवाटिका तयार करणे, रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग क्षेत्र विस्तार, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन व उत्पादकता वाढविणे असे उपक्रम राबवले गेले. मात्र उत्पादकता वाढण्याऐवजी  कमी झाल्याने हे सारे उपचार केवळ कागदावर झाल्याची चर्चा रंगली आहे. या भागातील लोकप्रतिनिधींची उदासीनता तसेच सहकारी तत्त्वावर आपल्या कुटुंबापुरते प्रक्रिया उद्योग उभारणे एवढ्यापुरतेच त्यांचे प्रयत्न संत्रा उत्पादनवाढीसाठी मर्यादित ठरले. त्याचाही फटका या भागातील संत्रा उत्पादकांना बसला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर आणि संत्रा बागायतदारांचे हित जपण्यासाठी हे उद्योग उभारण्यात आले आहेत. 

क्षेत्र झाले कमी
चव आणि रंगाच्या बाबतीत नागपूर संत्र्याची ओळख आहे. मात्र कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांना त्याचे गांभीर्य अजूनही कळाले नाही. ९० च्या दशकात विदर्भात सुमारे अडीच कोटीच्या वर संत्रा झाडे होती. उत्पादन आणि उत्पन्न चांगले होत असल्याने संत्र्या खालील क्षेत्र वाढले. सुमारे तीन लाख हेक्‍टरपर्यंत संत्रा बागांचा विस्तार विदर्भात होता अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. आज मात्र कीड-रोग कमी उत्पादकता आणि त्यामुळे मिळणारे कमी उत्पन्न या सर्व कारणांमुळे संत्रा लागवड क्षेत्र एक लाख सात हजार हेक्टरपर्यंत मर्यादित झाले आहे. विदर्भात संत्रा बागांचा होणारा रास यावर अनेकदा मनन झाले, परंतु उपायोजना मात्र काही झाल्या नाही. या शासन, प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका मात्र संत्रा बागायतदारांना बसला आहे. 

रोगमुक्त कलमांचा वापर न करणे, गरजेच्या वेळी बागेला देण्यासाठी पाण्याची उपलब्धता नसणे अशी अनेक कारणे उत्पादकता कमी असण्यामागे आहेत. सघन लागवड केल्यास उत्पादकता वाढू शकते. काही शेतकरी तंत्रशुद्धपणे बागेचे व्यवस्थापन करतात. त्याआधारे चाळीस टनांपर्यंत त्यांची उत्पादकता पोहोचली आहे. 
- मिलिंद लदानिया, संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था.

तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव हे उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर असण्याचे मुख्य कारण आहे. द्राक्षामध्ये १९ वाण आहेत आणि द्राक्ष ३५ देशात निर्यात होतात. संत्रा उत्पादकांना मात्र गेल्या अनेक दशकांपासून एकाच वाणावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे संशोधक संस्थांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची गरज आहे.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

याकडे दुर्लक्ष 
  रोगरहित कलम
  डिंक्या नियंत्रणासाठी संशोधन.
  तंत्रशुद्ध छाटणीकरिता मार्गदर्शन.
  छाटणी कामी संयंत्रांचा अभाव.
  एकाच वाणावर अवलंबित्व.
  नवीन संशोधनाचा अभाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com