

Maharashtra Drought Relief
esakal
नागपूर : ‘‘राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून ‘ट्रिगर तीन’अंतर्गत मदत देण्यात येईल. दुष्काळी परिस्थितीत कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती व शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. ‘‘पर्जन्यमानाची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, या तालुक्यांमध्ये १२ उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची मदत योग्य ती कार्यपद्धतीची पूर्तता करून दिली जाईल. ज्या तालुक्यांचा समावेश यादीत नाही अशा सर्व तालुक्यांची तपासणी करून ‘ट्रिगर तीन’मध्ये समावेश करण्यात येईल.
प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार केला असून त्यानुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येईल. राज्यातील बहुतांश प्रकल्पांत पिण्याचे पाणी उपलब्ध असून जुलै -ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवून अतिरिक्त उपलब्ध पाणी रब्बीसाठी देता येईल का, याचाही प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
एल निनोमुळे निर्माण झालेली परिस्थिती फेब्रुवारी अखेरपर्यंत उच्चांक पातळी गाठण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना जनतेनेही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागांमध्ये कशी मदत करता येईल, ती सर्वांनी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
छत्तीसगडमधील अतिवृष्टीमुळे गडचिरोलीतील भामरागड येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येत असून मी प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. सध्या परिस्थिती निवळत असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.