

Chandrashekhar Bawankule
esakal
मुंबई, ता. २२ : राज्यात अवर्षणामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, उद्यापासून (ता. २३) शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. तसेच शनिवारपूर्वी दुष्काळासंदर्भातील पहिली अधिसूचना जाहीर केली जाईल, पाहणी दौरे होऊन उपाययोजना वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येतील. यासंदर्भात तत्काळ निर्णय घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष होते. फडणवीस यांनी या बैठकीनंतर वरील माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील प्राथमिक माहिती जमा करण्यात आली आहे.
त्याच्या आधारावर दुष्काळाबाबतची पहिली अधिसूचना काढणार असून, आतापर्यंतच्या माहितीच्या आधारावर उपाययोजनांविषयीची माहिती सातत्याने येत राहणार आहे. यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली असून, ही उपसमिती दुष्काळाबाबत निर्णय घेईल. शेतीच्या नुकसानीची माहिती जमा करण्यासाठी पिकांचे पंचनामे आजपासून (ता. २३) करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती संकलित झाल्यानंतर मदतीला वेग येईल.’’
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळी भागाचा आजपासून दौरा करणार असल्याची माहिती दिली.
कर्नाटकनेही दुष्काळ घोषित केलेला नाही, असा खुलासाही फडणवीस यांनी केला. राज्याच्या कृषी विभागाचा मंजूर सुधारित आकृतिबंध रद्द करण्यास व आकृतिबंधाबाबत फेरप्रस्ताव सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
मागील आठवड्यात कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी याबाबत घोषणा केली होती. उपसमितीमध्ये जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील आदी यांचा समावेश आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल या समितीचे सदस्य सचिव असतील.
"सरकारने पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा या दोन गोष्टींवर लक्ष देण्याचे ठरविले आहे. पुढील सात ते आठ महिने दुष्काळाचा ताण सहन करावा लागणार आहे. महापालिका, नगरपालिका आणि पंचायत राज संस्थांना पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. "
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.