महाराष्ट्रातील सरकार निकम्मे - उद्धव ठाकरे

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

नगर - 'केडगाव येथील दुहेरी हत्याकांड राज्याला हादरवून सोडणारे आणि सत्ताधाऱ्यांना लाज वाटायला लावणारे आहे. छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलेले सरकार मोगलाई पोसत असून, हे सरकार "निकम्मे' आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ठीक करण्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा,'' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे राज्य सरकारला झोडपले.

केडगाव येथील शिवसेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे यांची सात एप्रिलला हत्या झाली. त्यांच्या कुटुंबीयांची ठाकरे यांनी आज भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार चंद्रकांत खैरे व सदाशिव लोखंडे, आमदार विजय औटी, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, महिला आघाडीच्या राज्याच्या प्रमुख रीटा वाघ, संपर्कनेते भाऊ कोरगावकर आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, 'ठुबे व कोतकर हत्येप्रकरणी साक्षीदारांवर दबाव आणला जात आहे. शिवरायांबाबत अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांबाबत अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत परिचारक यांच्या औलादींना हे सरकार बरोबर घेत आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांचे अधिकार वापरल्यास त्याबाबत मुख्यमंत्रीच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत. राज्यातील विकास करताना सर्वसामान्यांच्या व विशेष करून महिलांच्या आक्रोशाकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्या, असे आवाहन मी मुख्यमंत्र्यांना करत आहे.''

ठाकरे म्हणाले, 'खून प्रकरणाचा आणि त्याबरोबरच पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याचा तपास योग्य दिशेने होत नाही. तपास यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात दबाव आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबाबत गांभीर्याने न घेतल्यामुळेच त्यांना जामीन मिळाला. या गुन्ह्यांच्या तपासासाठी कृष्ण प्रकाश यांच्यासारखे अधिकारी आवश्‍यक आहेत. सरकारचा निकम्मेपणा संपला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून, कायदा हातात घेऊन लोकांचे संरक्षण करील.''

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केडगाव येथील खून "राजकीय हत्या' नसल्याचे म्हटल्याकडे लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले, ""ही हत्या राजकीय नसल्याचे त्यांना माहिती आहे, तर त्यांनी पुढे येऊन साक्ष द्यावी आणि सत्य काय ते सांगावे.''

या वेळी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे (दक्षिण), रावसाहेब खेवरे (उत्तर), महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदरही उपस्थित होते.

उज्ज्वल निकम यांना विनंती
'ठुबे व कोतकर कुटुंबीयांनी या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. त्यानुसार मी ऍड. निकम यांच्याशी चर्चा केली असून, ते हा खटला चालवतील, असा मला विश्‍वास आहे. ठुबे व कोतकर कुटुंबीयांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेणार आहे,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अटक झाली का?
केडगाव येथे घटनेनंतर झालेल्या दगडफेकीचे शिवसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. अद्याप गुन्हे मागे घेतले नसल्याने शिवसेनेचे सरकारमधील वजन कमी झाले का, असे विचारले असता, "शिवसैनिकांना अटक झाली का,' असा प्रतिप्रश्‍न करीत त्यांनी सूचक उत्तर दिले.

बंद खोलीत चर्चा
पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे, मंत्री केसरकर, शिंदे, शिवतारे, कदम यांनी बंद खोलीत चर्चा केली. त्या वेळी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मादेखील उपस्थित असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही; मात्र शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्याबाबतच चर्चा झाल्याचे बोलले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com