Marathi News Update : दिवसभरातील पावसाचे अपडेट्स अन् राजकीय घडामोडी एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Update : दिवसभरातील पावसाचे अपडेट्स अन् राजकीय घडामोडी एका क्लिकवर...

टोळेवाडी ग्रामस्थांनी केला सॅटेलाइट फोनचा वापर

साताऱ्यातील टोळेवाडी (ता.पाटण) येथील ग्रामस्थांसमवेत पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांनी भर पावसात डोंगरकडाची पाहणी करत असताना अचानक पाऊस वाढल्याने मोबाईल फोन बंद झाला. त्यामुळे नव्यानेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सॅटेलाईट फोनचा वापर केला. संबंधित गावाचे ग्रामस्थ यांनी देखील सदर फोनवरून संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा करून माहिती दिली. नैसर्गिक आपत्ती दरम्यान सॅटेलाईटच्या फोनचा ग्रामस्थांनी सक्षमपणे वापर केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

विशाळगड परिसरातील कासारी धरण 80 टक्के भरले

विशाळगड परिसरात आज पावसाचा जोर ओसरला होता. पावसाने उघडीप दिल्याने उन्हानेही दर्शन दिले. पावसाने उघडीप दिली असली तरी एखादी पावसाची सर सर्वत्र पाणीच पाणी करत होती. येथील कासारी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत १७१ मिमी पाऊस झाला. धरणात ७९.७० टक्के पाणीसाठा असून धरण २.७७ टीएमसी पैकी २.२१ टीएमसी भरले आहे. १ जून ते आजअखेर धरण क्षेत्रात २१९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून प्रतिसेकंद १००० क्युसेस पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात सुरू आहे.

साताऱ्याला चार दिवसांसाठी ऑरेंज अ‍लर्ट 

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात कोयनानगरला १५०, नवजाला २०१, तर महाबळेश्वरला १८५ मिलिमीटर पाऊस झाला. धरणात प्रति सेकंद ५९ हजार ८५१ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा चोवीस तासात चार टीएमसीने वाढला आहे.

१०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा ५१.९३ टीएमसी झाला असून ४९.३३ टक्के भरले आहे. तर धोम बलकवडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर आहे. त्यामुळे धरणातून कालपासून सुरू असलेला प्रतिसेकंद २०२० क्युसेक विसर्ग वाढवून २२९८ क्युसेकपर्यंत केला आहे. सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

बेळगावच्या राकसकोप जलाशयाचे दरवाजे उघडले

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राकसकोप जलाशय वेगाने भरु लागले आहे. जलाशयाची पातळी 2472 फुटावर पोचली असून पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 3 फूट पाण्याची गरज आहे. सध्याचा पाऊस पाहता जलाशय लवकरच भरण्याची शक्यता आहे. राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 2475 फूट पाण्याची गरज असते. त्यामुळे जलाशयाचे दोन दरवाजे 2 इंचानी उघडण्यात आले आहेत.

चंदगडच्या पश्चिम भागात पावसाचा जोर; बेळगाव- वेंगुर्ला राज्यमार्गावर पाणी

चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असून आज सहाव्या दिवशीही १३ बंधारे पाण्याखाली राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तीन राज्यांना जोडणारा बेळगाव- वेंगुर्ला राज्यमार्गावर दाटे आणि कानूर येथे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूर्व भागात आज दिवसभर पावसाचा जोर कमी होता. तब्बल ६ दिवस पाणी शेतात तुंबून राहिल्याने नदीकाठावरील भात रोप लावणी कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गावरील दाटे येथे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या रस्त्यावर २ फूट पाणी असल्याने पोलीसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी बॅरिकेटस लावून बंद केला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

गडहिंग्लज पूर्व भागातील गावे संपर्कहीन; हिरण्यकेशीची पाणीपातळी वाढली

गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. काल रात्री चंदगड राज्य मार्गावरील भडगाव पूल पाण्याखाली गेला आहे. तर आज पहाटेपासून पूर्व भागातील जरळी बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. यामुळे गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागासह चंदगड मार्गावरील गावे संपर्कहीन झाली आहेत.

आज (दि.२४) दुपारी बारा वाजेपर्यंत भडगाव पुलावर पाच ते आठ इंचापर्यंत पाणीपातळी होती. पावसाचा जोर ओसरला तर सायंकाळ किंवा रात्रीपर्यंत हा पूल खुला होऊ शकतो. हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, निलजी व घटप्रभा नदीवरील कानडेवाडी हे बंधारे अद्याप पाण्याखालीच असून, येथील वाहतूक बंदच राहिली आहे.

सोशल मीडियात महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- फडणवीस

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अवमानकारक लिखाण करणाऱ्यांचा शासनाने निषेध केला आणि त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जी कलमे लावता येतात ती लावण्यात आली आहेत. यासाठी एक समिती तयार करण्यात येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली जातील, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिलं.

सूरज चव्हाण यांची आजची चौकशी संपली

पाच तासांच्या चौकशी नंतर सूरज चव्हाण मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून रवाना झाले आहेत. जंबो कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी आजची चौकशी पूर्ण झाली आहे.

याच प्रकरणी मनी लॉड्रिंगचा तपास करणाऱ्या ED ने काही माहिती दिल्यानंतर सुरज चव्हाण यांची चौकशी झालीय.

मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा ट्रॅफिक जाम झाली असून कात्रज दरी पुलापासून वारजे पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नव्या संसदेत कार्यालय मिळणार?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नव्याच संसदेत कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर लोकाभेतील पक्षकार्यालयाचा ताबा शिंदे यांच्या सेनेकडे गेला होता. त्यांनतर ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पक्षकार्यालय देण्याची मागणी केली होती. पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

पिकांसाठी १० हजारांची मदत- अजित पवार

१९ ते २३ जुलै यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या भागात पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईपोटी पाच ऐवजी १० हजारांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अजित पवारांनी सभागृहात ही माहिती दिली.

उद्या 92 नगरपालिकामधील ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी

उद्या 92 नगरपालिका मधील ओबीसी आरक्षणाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होणार आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ह्दयविकाराचा सौम्य झटका

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ह्दयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहीती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी असताना त्यांना ह्दयविकाराचा सौम्य झटका आला आहे.

उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान म्हणून झळकले बॅनर

उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान म्हणून बॅनर झळकले आहेत.मातोश्री बाहेर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे.

जुनागडमध्ये दोन मजली इमारत कोसळली

जुनागडमध्ये दोन मजली इमारत कोसळली. इमारतीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

कोयना धरणाच्या विद्युतगृहातून होणार 1050 क्युसेक्स विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. धरणामध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून आज दि. 24 जुलै रोजी दुपारी 4:00 वा.1050 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे.तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून ग्रामस्थांनी नदी पात्रात जावू नये. तसेच त्यांनी जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना सूचना

कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पुराचे पाणी आपल्या भागात वाढत असल्यास दुर्लक्ष करू नका.अतीआत्मविश्वास न बाळगता आपल्या कुटुंबीयांचे तसेच जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून घ्यावे. भूस्खलन होणाऱ्या भागात तसेच नदीकाठी राहणाऱ्या, नागरिकांनी सतर्क रहावे. काही भागात पुराचे पाणी रस्त्यावर पाणी आले असल्यामुळे रस्ते बंद आहेत, अशा रस्त्यावरून वाहतूक होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी.

पुराच्या पाण्यात वाहन चालवून आपला जीव धोक्यात घालू नका. गावातील कार्यकर्ते तसेच तरुण मंडळे यांनी नागरिकांकरिता प्रबोधनात्मक डिजीटल बॅनर्स व सूचना फलक लावावेत. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

तातडीच्या मदती करता संपर्क - 112 व 0231-2662333

अजय सिंदकर (पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे)

मोबा : 8369096182

कोल्हापूर जिल्ह्यातील एकुण १४ मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद

कोल्हापूर जिल्ह्यातील एकुण १४ मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद

कोल्हापूर ते गगनबावडा

गडहिंग्लज ते नेसरी

रंकाळा ते पडसाळी

चंदगड ते बेळगांव

चंदगड ते हेरा

रंकाळा आरळी

चंदगड ते कानूर

चंदगड ते बुजवडे,

रंकाळा ते चौके

रंकाळा ते गगनबावडा

गडहिंग्लज ते चंदगड

गडहिंग्लज ते हाजगोळी

चंदगड ते कोल्हापूर

कागल ते पणजी

आपचे खासदार संजय सिंह यांचे निलंबन

आपचे खासदार संजय सिंह यांचे निलंबन करण्यात आले आहे. मणिपूरच्या मुद्द्यावरून गोंधळ घालत असल्यामुळे राज्यसभेतुन निलंबन करण्यात आलं आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी सिंह याचं निलंबन केलं आहे. उर्वरीत पावसाळी अधिवेशन काळासाठी संजय सिंह यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची चौकशी सुरू

युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिसांची SIT चौकशी सुरू आहे. महापालिकेने २०११ ते २०२० दरम्यान केलेल्या १२००० कोटी रुपयांच्या खर्चात कथित आर्थिक अनियमिता झाल्याचा कॅगचा रिपोर्ट आहे. कॅगच्या रिपोर्टनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून SIT ची स्थापना करण्यात आली आहे.

आज सोमवार २४ जुलै रोजी बेळगाव, खानापूर, कित्तूर, तालुक्यातील शाळांना सुट्टी

सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर आणि तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून हा आदेश दिला आहे.

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिखली गावातील लोकांचे स्थलांतर सुरु करण्यात आलं आहे.

• राजाराम बंधारा पाणी पातळी 39 फूट 08 इंच

• पंचगंगा नदी धोका पातळी - 43'00 फूट

• एकूण 'पाण्याखालील बंधारे - 83

मध्यरात्रीच्या मुसळधार पावसातही कोल्हापुरातील वाहतूक झाली सुरळीत

मध्यरात्री साधारण 1.30 ची वेळ देवगड - निपाणी- कलादगी या राज्य मार्गावर फोंडाघाटात झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी होवू लागली. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. अशावेळी या मार्गावरील वाहन चालकाने नियंत्रण कक्षाच्या १०० आणि १०१ क्रमांकावर संपर्क केल्यावर लगेचच उपअभियंता एस. बी. इंगवले, शाखा अभियंता एस. के. किल्लेदार, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्यासह पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी याठिकाणी पोहोचले. मुसळधार पावसातही प्रशासकीय यंत्रणेने कार्यतत्परता दाखवत पहाटे 3 वाजेपर्यंत रस्त्यावर पडलेले झाड हटवले आणि घाट मार्गातील वाहतूक सुरळीत सुरु झाली.

इतक्या मोठ्या मुसळधार पावसातही अल्पावधीतच घाटरस्ता मोकळा झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. या मार्गावरुन जाणाऱ्या आणि इथल्या वाहतूक कोंडीतून जलदगतीने बाहेर पडलेल्या एका ट्रॅव्हल्स च्या वाहनचालकानेही या कृतीची दखल घेत "धन्यवाद राधानगरी पोलीस, PWD department राधानगरी" असा संदेशही पाठवला.

अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थितीत राधानगरी विभागाचे पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जलदगतीने केलेल्या कामाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कौतुक केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाऊस व पाणीसाठा

सातारा – जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 72.19 अब्ज घन फूट पाणी साठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 48.49 टक्के इतका असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे. मोठे प्रकल्प – कोयना –46.67 (46.61), धोम – 5.69 (48.67), धोम – बलकवडी – 3.35 (84.60), कण्हेर –4.7 (42.44), उरमोडी – 4.40 (45.60), तारळी – 4.64 (79.45).

मध्यम प्रकल्प – येरळवाडी – 0.0024 (0.35), नेर – 0.08 (19.47), राणंद – 0.01 (4.42), आंधळी – 0.06 (22.14), नागेवाडी – 0.06 (26.67), मोरणा – 0.92(70.46), उत्तरमांड – 0.32 (37.33), महू – 0.83 (76.42), हातगेघर – 0.08 (31.16), वांग (मराठवाडी) – 1.01 (37.13) या प्रमाणे पाणीसाठा आहे.

कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 150 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मोरणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 107 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच धोम – 18 मि.मी., धोम – बलकवडी – 94, कण्हेर – 27, उरमोडी – 41, तारळी – 56, येरळवाडी – 3, उत्तरमांड – 40, महू – 52, हातगेघर – 52, वांग (मराठवाडी) – 35, नागेवाडी-19 मि.मी पाऊस झाला आहे. तर नेर, राणंद, आंधळी धरणाच्या क्षेत्रातील कालचा पाऊस निरंक आहे.

नाशिकमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ

नाशिकमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. सिडकोनंतर आता नाशिकरोडच्या विहितगाव परिसरात युवकांची दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यरात्री युवकांनी कोयता घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. कोयता मारून गाड्यांची तोडफोड तर रामकृष्ण हरी प्राईड बिल्डिंग मधल्या गाड्या जाळल्या आहेत. परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मि.मी.पाऊस

सातारा दि. 2 (जि.मा.का.) : गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मि.मी पाऊस झाला असून जिल्ह्यात सरासरी 25.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 309.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून एकूण सरासरीच्या 30.4 टक्के इतका पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा –23.5 (308.8), जावली-मेढा –44.0(561.4),पाटण –66.3(609.1), कराड –20.2 (168.0), कोरेगाव –8.6 (136.1), खटाव–वडूज –6.9(109.5), माण – दहिवडी –6.1 (97.6), फलटण –1.2 (68.3), खंडाळा –6.2 (100.9),वाई -19.3 (230.2), महाबळेश्वर –104.4 (1671.9) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

संसदेच्या कामकाजाला सुरुवात मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधक सभागृहात आक्रमक

संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधात आक्रमक झाले आहेत. सरकार चर्चा करायला तयार असल्याचे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले आहे.

ज्ञानवापीचे ASI सर्वेक्षण सुरु, वाराणसीत हाय अलर्ट

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने वाराणसीतील ज्ञानवापीचे सर्वेक्षण सुरू केलं आहे. 30 सदस्यीय एएसआय पथक आज सकाळी 6.30 वाजता ज्ञानवापीमध्ये दाखल झाले. सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर वाराणसीला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज दोन तासांचा ब्लॉक

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ रात्री 11.30च्या सुमारास दरड कोसळली ही दरड माती बाजूला करण्यासाठी २ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पावसाच्या ऑरेंज अलर्टमुळे रायगडमधील शाळा, कॉलेजांना सुट्टी

पावसाच्या ऑरेंज अलर्टमुळे रायगडमधील शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अंधेरी पूर्वेकडील स्टेशन परिसरातील कपोल बँकेला भीषण आग

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील स्टेशन परिसरात पहाटे 4:30 च्या सुमारास कपोल बँकेमध्ये भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. अर्ध्या तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही , मात्र या आगीत कपोल बँक संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास अग्निशमन दलाच्या जवान आणि अंधेरी पोलीस करत आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्याने वाहतूक मंदावली; मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन सुरू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ रात्री 11.30च्या सुमारास दरड कोसळली. यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवरील तिन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन सुरू झाल्या आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com