Marathi News Update : दिवसभरातील राजकीय घडामोडी अन् पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Update : दिवसभरातील राजकीय घडामोडी अन् पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

बेळगाव जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील शाळांना उद्या सुट्टी

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उद्या बुधवार दि. 26 रोजी मुसळधार पावसामुळे बेळगाव (शहर व तालुका), खानापूर, निपाणी, मूडलगी, यरगट्टी आणि सौंदती तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. खानापूर तालुक्यातील पीयु महाविद्यालयांना देखील एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.

नाव बदलल्याने 'गेमचेंज' होणार नाही- योगी आदित्यनाथ

नाव बदलल्याने 'गेमचेंज' होणार नाही, असा टोमणा योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांच्या एकजुटीवरुन मारला आहे. पुढे त्यांनी ''It's INDIA Vs I.N.D.I.A.'' असं ट्वीट केलं आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून विसर्ग सुरु

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच विसर्ग सुरू झाला असून गतवर्षी 12 जुलै रोजी पहिला विसर्ग सुरू करण्यात आलेला होता.

सातवेळा निवडून आलेल्या तृष्णा विश्वासराव यांचा शिंदे गटात प्रवेश

माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी आज आमदार सदा सरवणकर आणि आमदार मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तृष्णा विश्वासराव यांची पक्षाच्या उपनेतेपदी निवड करत असल्याची घोषणा केली.

अंधेरीतील लोखंडवाला परिसरात इमारतीला आग

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या लोखंडवाला परिसरामध्ये एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. लोखंडवाला परिसरातील फोर्थ क्रॉस रोड लेन येथील नेऊला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घराला मोठी आग लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,संध्याकाळी साडेसातच्या सुमारास लोखंडवाला फोर्थ क्रॉस रोड लेन मधील नेऊला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घराला मोठी आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तात्काळ घटनास्थळावर रवाना होऊन आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. आगीची घटना लक्षात येताच घरातील रहिवासी तात्काळ बाहेर पडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

कोल्हापुरात भिंत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू 

कोल्हापुरात भिंत कोसळली, दोन महिला अडकल्या

कोल्हापूरच्या खासबाग मैदानात भिंत कोसळल्याची घटना घडली असून भिंतीखाली दोन महिला अडकल्या आहेत. महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबईत मुसळधार पावसामुळे घर कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसासोबतच मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागत आहे. मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील केतकी पाडा भागातील शिवशक्ती चाळीतील एक घर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. दहिसर पूर्वेकडील सिलेंडर गोडाऊन परिसरातील एक चाळीतील घर कोसळून ही दुर्घटना झाली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

'पीओपी'च्या मूर्तींबद्दल मंत्री केसरकर यांनी मांडली भूमिका

यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवायला कोणतीही बंदी नाही मात्र या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं, असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत केलं.

कृत्रिम तलावांची पुरेशी सोय प्रशासनामार्फत करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर सरसकट बंदी घालू नये, यामुळे मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत आहे, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे केली होती. त्याला केसरकर उत्तर देत होते.

मूर्तींवर वापरल्या जाणाऱ्या रंगांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील, असं केसरकर यांनी यावेळी सांगितलं.

रस्त्याअभावी गरोदर महिलेचा मृत्यू

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. उपचार न मिळाल्याने ही घटना घडली आहे.

दहीहंडी उत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु

दहीहंडी समन्वय समिती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु आहे. येणारा दहिहंडी उत्सव कसा साजरा करायचा यावर चर्चा सुरु असून उत्सवादरम्यान नियम व अटींसंदर्भात काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

रेड अथवा ऑरेंज अलर्ट मिळताच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा; सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

सातारा : भारतीय हवामान विभागाकडून सातारा जिल्हयाला ज्या-ज्या वेळी रेड अलर्ट अथवा ऑरेन्ज अलर्टचा इशारा देण्यात येईल अशावेळी पश्चिमेकडील तालुक्यातील विशेषत: पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा या तालुक्यामध्ये तसेच उर्वरित तालुक्यामधील ज्या गावांमध्ये संभाव्य भूस्खलन/ दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो, अशा गावांमधील नागरिकांना आगाऊ सूचना देऊन तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी ही संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांची राहिल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी दिले आहेत.

वेंगुर्ला-बेळगाव मार्गावरील वाहतूक सुरु

बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील कानूर बाजार व दाटे या दोन्ही ठिकाणचे पाणी कमी झाल्याने वेंगुर्ला बेळगाववरील वाहतूक सुरु केल्याची माहिती चंदगड पोलीसांनी दिली आहे.

पुराचा धोका ओळखून कोल्हापुरातल्या २८ शाळा बंद

कोल्हापुरातील संभाव्य पुराच्या पहिल्या टप्प्यात येणाऱ्या 28 गावातील शाळा उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी ही माहिती दिली.

मिठी नदीप्रकरणी दोषींवर कारवाई होईल का?- अनिल परब

मिठी नदीप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्हीदेखील केली आहे. गाळ काढला तो कोणाच्या खिशात गेला त्यासाठी चौकशीची गरज आहे, मुख्य म्हणजे ज्यांची नावे येतील त्यावर कारवाई होईल का?, असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.

IRCTC ची वेबसाईट झाली सुरू

IRCTC ची वेबसाईट सुरू झाली आहे. तांत्रिक कारणांमुळे IRCTC ची वेबसाइट आणि अॅप ठप्प झाले होते. तांत्रिक कारणांमुळे तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध होत नव्हती. तांत्रिक कारणांमुळे तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध होत नव्हती. आमची तांत्रिक टीम समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे IRCTCने सांगितले होते.

IRCTC वेबसाईट बंद असल्यामुळे रेल्वे काऊंटरवरची लोकांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त काऊंटर सुरू

IRCTC वेबसाईट बंद असल्यामुळे रेल्वे काऊंटरवरची लोकांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त काऊंटर सुरू करण्यात आले आहे. मुंबई विभागात विविध स्थानकात १३ काउंटर सुरू करण्यात आले आहेत.

बेलापुरमध्ये रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; खराब रस्त्यामुळे नागरीक हैराण

बेलापुरमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खराब रस्त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.

मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरीक हैराण झाले आहेत. पावसाने रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत.

सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतुक कोंडी

सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे.

पुण्यावरुन महाडला जाणारी वाहतूक बंद

पुण्यावरुन महाडला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.

नाशिकमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच

नाशिकरोड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. २४ तासांत दुसरी तोडफोडीची घटना समोर आली आहे. ४ ते ५ वाहनांची तलवारी आणि कोयत्याने काचा फोडल्याची माहिती आहे. काल विहितगाव येथे तोडफोड झाली होती.१२ जुलैलाही सिडको परिसरात १६ वाहनांची तोडफोड झाली होती. टवाळखोरांकडून दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड केली जातेय. शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

अजित पवार गटाकडून मुंबईत संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू

अजित पवार गटाकडून मुंबईत संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अजित पवार गटाची आज दुपारी 3 वाजता पक्ष कार्यालयात बैठक बोलावली आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित रहणार आहेत. बैठकीमध्ये मुंबईतली संघटना बळकट करण्यासाठी पदाधिकारी नेमणूक आणि आगामी काळातील मुंबईमहानगरपालिकेसाठीचे रणनीती याबाबत चर्चा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री शिंदे अन् अजित पवारांनी घेतले मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 40 फूट 4 इंचावर; नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे आणि आता पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 4 इंचावर आहे. सध्या ही पाणी पातळी स्थिर आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या सात तासापासून स्थिर आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुटांवर आहे. तर धोका पातळी 43 फुटांवर आहे.

डॉ. मोहन भागवत यांनी घेतलं मदनदास देनी यांच्या पार्थिवाच दर्शन

डॉ. मोहन भागवत यांनी मदनदास देनी यांच्या पार्थिवाच दर्शन घेतलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मदनदास देवी वय 81 यांचे 24 जुलै रोजी पहाटे 5 वाजता बंगलोर येथे निधन झाले आहे. मदनदास यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यविधी होणारआहे. त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी डॉ. मोहन भागवत पुण्यात आले आहेत.

कोल्हापुरातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी आणि काळम्मावाडी धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरण 94 टक्के पर्यंत भरले आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी धरणे भरतील की नाहीत अशी परिस्थिती असताना आठवड्यामध्ये ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.

➡️राधानगरी धरण 8.36 टीएमसी पैकी 7.82 टीएसमी (93.55 टक्के) भरले आहे

➡️काळम्मावाडी (दूधगंगा) धरण 25.39 टीएमसी पैकी 13.10टीएमसी (51.58 टक्के) भरले आहे.

➡️वारणा (शिराळा) धरण 34.39 टीएमसी पैकी 26.66 टीएमसी (77.50 टक्के) भरले.

➡️ राधानगरी पाण्याचा विसर्ग : 1400 क्यूसेक

➡️ पाण्याखाली असणारे बंधारे : 82

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा

पुढच्या तीन ते चार तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसोबतच ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री उशिरा पुण्यात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री उशिरा पुण्यात दाखल झाले. अमित शाह यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पुण्यामध्ये आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचं काल पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यासाठी अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार पुण्यात असणार आहेत.

मुंबईतील पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कूलमधील लॅबची गॅलरी कोसळली, जीवितहानी नाही

मुंबईतील मेघवाडी परिसरात असलेल्या पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कूलमधील लॅबची गॅलरी आज सकाळी ६.४५ च्या सुमारास कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही: मुंबई पोलीस

मुंबईतील अंधेरी पूर्व भागात कोसळली दरड, चार ते पाच फ्लॅटवर डोंगराचा ढिगारा

मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दरड दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.या दरड दुर्घटनेमध्ये पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या या डोंगरामधून इमारतीवर सतत माती कोसळत आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com