चारचाकी वाहनामध्ये डांबून एका तरुणाला अमानुषपणे बेदम मारहाण करून भाईगिरी करीत दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित असलेल्या दादा लोकांची शेगाव शहर पोलिसांनी रात्री शेगावात धिंड काढली. ताडी परिसरात काही युवक भाईगिरी करून दहशत पसरवीत होते. त्यांच्याकडून गुन्हे देखील घडलेले आहेत. हा प्रकार थांबून भाईगिरी संपुष्टात आली पाहिजे. तसेच दहशत पसरविणाऱ्या युवकांवर अंकुश लागला पाहिजे. यासाठी शहर पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन पाटील यांनी नुकत्याच गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींची शहरातून दिंड काढली आहे. आरोपीने एका तरुणाला बेदम मारहाण करत परिसरात दहशत पसरवली होती. यासंदर्भात पिडीत युवकाच्या पत्नीने शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिच्या पतीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवुन लाकडी काठी व पट्टयाने बेदम मारहाण केल्याची घटना जगदंबा चौक परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल जाधव, प्रमोद जाधव, रोहन चौके, अक्षय चौके व ईतर ३ ते ४ लोक सर्व रा. शेगाव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी भाईगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सर्व आरोपींना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने या चौघांची त्याच परिसरातून पायी धिंड काढली आहे. एव्हडेच नव्हे तर भर चौकात कान् पकडून माफी शुद्ध मागायला लावली.