esakal | दिलासा नाहीच; राज्यातील कोरोना निर्बंध तुर्तास कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

दिलासा नाहीच; राज्यातील कोरोना निर्बंध तुर्तास कायम

sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोना संसर्गामुळे राज्यात लागू असलेले निर्बंध यापुढेही सुरूच राहणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्य सरकारला तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्याने निर्बंध कायम ठेवत राज्य सरकारने सावध पावले उचलली आहेत. इतर राज्यातून येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अहवालाऐवजी दोन्ही डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र पुरेसे ठरणार असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी दिली.

दुकानं आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल नसतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचंही टोपे यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: राज्यात लवकरच महाभरती; MPSC अंतर्गत 15 हजार जागा भरणार

संपूर्ण राज्याला आपण कोरोना संसर्गाच्या वर्गवारील 'लेव्हल-३' मध्ये आणलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांमध्ये कुठलीही सूट देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री याचा सातत्याने आढावा घेत आहेत, असंही टोपे यांनी यावेळी सांगितंल.

हेही वाचा: इंग्लंडमधील भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. देशाच्या तुलनेत सध्या महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा दर कमी असला तरी पुढील संभाव्य धोका लक्षात घेता आपल्याला सावधपणानेच पुढे जावे लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता कोविड विषयक जे नियम आणि निर्बंध आहेत त्यात कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले. ‘लसीकरणाचा वेग चांगला असला तरी राज्यात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी तो आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात राज्याला सव्वाचार कोटी लस मिळणे अपेक्षित आहे,’ असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करता यावा यासाठी आणखी एक हजार डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात त्याची जाहिरात प्रसिद्ध होईल, असेही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: फडणवीस यांना नेता मानत नाहीत का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

loading image