esakal | फडणवीस यांना नेता मानत नाहीत का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

फडणवीस यांना नेता मानत नाहीत का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

फडणवीस यांना नेता मानत नाहीत का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

‘‘नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी आपापले राजीनामे मागे घ्यावेत’’ असे आवाहन करत माजीमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ही धर्मयुद्धाची वेळ नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा हे आपले नेते असल्याचे सूचक विधान मंगळवारी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले. ‘पक्षात राम उरला नाही असे वाटले तेव्हा बघू’ असे सांगतानाच त्यांनी तशी वेळच आपल्यावर येणार नाही, असा आशावाद देखील व्यक्त केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं नसल्याचं दिसल्यानंतर काही पत्रकांनी यावरुन त्यांना प्रश्न केला होता. यावर पंकजा मुंडे यांनी आपल्या शैलीत उत्तर देत वादावर पडदा टाकण्याचं काम केलं आहे.

मोदी, शहा, नड्डा यांच्या यादीत आपण देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले नाहीत, आपण त्यांना नेता मानत नाही काय? असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी केला होता. यावर त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय स्तरावर काम करत असल्याने आपण त्या स्तरावरील नेत्यांची नावे घेतली असे उत्तर दिले. मुंडेसाहेबांनी विलक्षण संघर्ष केला , पक्ष वाढवला, त्यांचे कार्यकर्तेही संघर्षशील आहेत असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: काँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

राजीनामे घेऊन मुंबईत भेटीस आलेल्या सुमारे ७० नाराज कार्यकर्त्यांना शांत करतानाच पंकजा यांनी मोदी, शहा हेच आपले नेते असल्याचे जाहीर केले. ‘‘ आपण विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी गेलो होतो पण अन्य नावाची शिफारस झाल्याने तो मागे घेतला. केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रीतमचे नाव चर्चेत होते पण डॉ.भागवत कराड मंत्री झाले. कराड यांच्या शपथविधीला गेले असते पण योग्य वेळी माहिती कळली नाही.’’ असेही त्या म्हणाल्या. तसे पाहता सध्या धर्मयुद्ध सुरु आहे, आपण पक्षादेशाचा आदर केला. वेगळा विचार करण्याची ही वेळ नाही असे सांगत त्यांनी स्वतःवर अन्याय झाल्याचेही अप्रत्यक्षपणे सूचित केले. आम्ही खूप सोसले. घर दुभंगलेले पाहिले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ‘‘ पक्षाने खूप दिले, ते मी लक्षात ठेवते. जे दिले नाही ते तुम्ही लक्षात ठेवा.’’ असेही कार्यकर्त्यांना सांगत त्यांनी भविष्यात वेळ पडल्यास संघर्ष करण्यास तयार असल्याचे नमूद केले.

हेही वाचा: नितीन राऊतांचे खाते पटोलेंना हवे?

loading image