esakal | नियम शिथील करण्याची दोन्ही काँग्रेसची मागणी ; मुख्यमंत्री सावध
sakal

बोलून बातमी शोधा

नियम शिथील करण्याची दोन्ही काँग्रेसची मागणी ; मुख्यमंत्री सावध

नियम शिथील करण्याची दोन्ही काँग्रेसची मागणी ; मुख्यमंत्री सावध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, नामदेव कुंभार

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, सरकारमधील महत्त्वाचे निर्णय आणि स्वबळावरून महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमधील धुसफूस उघड झाली असतानाच लॉकडाऊन शिथिलेतवरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या मंत्र्यांत मतभेद असल्याचेही दिसून येत आहे. हातावर पोट असलेल्या घटकांचा विचार करून नियम शिथिल करण्याचा दोन्ही काँग्रेसच्या मंत्र्यांचा सूर आहे. तर कोरोनाची दुसरी संपली नाही आणि तिसरी लाट येण्याच्या भीतीने मुख्यमंत्री सावध भूमिकेत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकाला शिथिलतेच्या या वादाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याची उत्सुकता राज्यभर आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह शिवसेनेचे काही मंत्री लॉकडाउनबाबत वेगवेगळी भूमिका घेत असल्याचे समजते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी, मार्चमध्ये रुग्णसंख्येचा आलेख वाढताच लॉकडाऊन जाहीर झाला. हा आलेख कमी होऊ लागल्यानंतर जून महिन्यांत काही नियम शिथिल करून ठाराविक वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नेमके याच काळात पुन्हा रुग्ण वाढले आणि व्यवहारांवर मर्यादा आल्या. परंतु, सततच्या लॉकडाउमुळे सामान्यांचे हाल होत असल्याने व्यवहारांवरील मर्यादा कमी करून ते पूर्ववत करण्याचा आग्रह धरला जात आहे. लॉकडाऊनच्या सरकारच्या भूमिकेला विरोधकांनीही विरोध केला. सरकारमधील काही मंत्र्यांनीही ठाकरे यांच्या निर्णयाला अप्रत्यक्षपणे विरोधही दर्शविल्याचे दिसून आले आहे. तरीही ठाकरे ठाम राहिले. त्यातून मंत्र्यांमध्येही नाराजी पसरली आहे.

हेही वाचा: पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटक

ठाकरे-पवार यांच्यात मतभेद?

कोरोनाच्या साथीत आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. उद्योग-धंद्यांवर परिणाम झाल्याने लोकांचे रोजगार जात आहेत, या बाबी विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लॉकडाऊन शिथिलतेबाबत अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. त्यावरून पवार आणि ठाकरे यांच्यातही मतभेद झाल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. त्यानंतर राज्यातील कोरोना रुग्णांचे रोजचे आकडे दाखवून मुख्यमंत्री ठाकरे यांनी गाफील राहाता येणार नसल्याचे जाहीर केले. त्याचा परिणाम पवार यांच्या नाराजीत झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: नियम बदला पण यानांच भारतरत्न द्या!, PM मोदींकडे मागणी

उपमुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचा दाखला

कोरोना रुग्ण वाढत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लॉकडाऊनला ठाकरे यांनाच जबाबदार धरले आहे. ठाकरे यांच्या निर्णयांचाच दाखला देत पवार माध्यमांपुढे भूमिका मांडतात. त्यामुळे पुण्यात लादलेल्या नव्या नियमांतून सवलत देण्याच्या व्यावसायिकांच्या मागणीचा पवार यांनी एकदाही गांभीर्याने विचार केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

loading image