नवी दिल्ली : मतदारयाद्यांच्या व्यापक पडताळणीसाठी सुरू असलेल्या मोहिमेची उत्तर प्रदेशसह सहा राज्यांतील मुदत निवडणूक आयोगाने वाढविली आहे. या निर्णयामुळे उत्तरप्रदेशसह तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अंदमान-निकोबारमधील मतदारांना अर्ज जमा करण्यासाठी वाढीव कालावधी मिळेल. निवडणूक आयोगाने आज ही घोषणा करताना स्पष्ट केले, की या राज्यांमध्ये आलेल्या अर्जांची संख्या आणि प्रशासकीय कारणे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तमिळनाडू आणि गुजरातमध्ये एसआयआर अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत रविवारपर्यंत (ता. १४ डिसेंबर) होती.