राज्यात खरिपाच्या ७२ टक्के पेरण्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे - राज्यात आतापर्यंत खरिपाचा ७२ टक्के पेरा झाला आहे. मात्र, ६० तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झालेला नाही. पावसाचा खंड वाढल्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पिके कोमेजू लागली आहेत. 

पुणे - राज्यात आतापर्यंत खरिपाचा ७२ टक्के पेरा झाला आहे. मात्र, ६० तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झालेला नाही. पावसाचा खंड वाढल्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पिके कोमेजू लागली आहेत. 

राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर स्वतः मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ते थेट शेतकऱ्यांना भेटून पीकपाण्याची माहिती घेत आहेत. कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, १४ जुलैअखेर राज्यात उसाचे क्षेत्र वगळता खरीप पिकांखालील १३९ लाख हेक्टरपैकी १०१ लाख हेक्टरवर म्हणजे ७२ टक्के क्षेत्रात पेरणी झाल्याचे नमूद केले आहे. पुणे, कोल्हापूर, कोकण भागात भात पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसातील खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून, उर्वरित पेरणीसाठी पावसाची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजुला काही जिल्ह्यांमध्ये कीडरोगाचादेखील प्रादुर्भाव झाला आहे. 

गेल्या तीन-चार दिवसांत काही भागात पाऊस होत असला तरी याची व्याप्ती राज्यभर नाही. नाशिकसह पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, पालघर आणि ठाणे भागात चांगला पाऊस झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गडचिरोली, भंडारा तसेच विदर्भात वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, परभणी, नांदेड आणि खानदेशात जळगाव भागातदेखील एक जून ते १४ जुलै दरम्यान ५० ते ७५ टक्के पाऊस झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रात २१.५१ लाख हेक्टरपैकी ६२ टक्के भागात पेरणी झाली असून, अनेक भागांत पावसाअभावी पेरणीची कामे खोळंबली आहेत. पुणे विभागात ८३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, पावसाअभावी कामे थांबली आहेत. 

कोल्हापूर विभागात २० तालुक्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. या विभागात ८ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, पेरा ६२ टक्के झाला आहे. पावसाचा खंड असल्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. पिकांची वाढदेखील खुंटत असल्याचे निरीक्षण कृषी विभागाचे आहे. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात २८ पैकी आठ तालुक्यांमध्ये कमी पाऊस आहे. पेरण्या ९३ टक्के झालेल्या असल्या तरी पावसाअभावी पिके सुकत असल्याचे दिसते लातूर विभागात ४८ पैकी १८ तालुक्यांत पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे पेरा ८२ टक्के झाला असून, पिकांची वाढ खुंटली आहे. 

भाताची पुनर्लागवड खोळंबली
विदर्भात नागपूर विभागात भाताची पुनर्लागवडीची कामे खोळंबल्यामुळे एकूण पेरा फक्त ५२ टक्के झाला आहे. अमरावती विभागातदेखील पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. ३२ लाख हेक्टरपैकी ७७ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून, पावसाचा खंड असल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागात पिके सुकत असल्याचे आढळल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

सोयाबीन, कापसावर किडीचा प्रादुर्भाव 
सातारा जिल्ह्यात सोयाबीनवर चक्री भुंग्याचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आहे. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन व कापूस पिकावर ४०९ हेक्टरवर मिलीपिड किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात कापूस पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्याची नोंद कृषी विभागात अहवालात करण्यात आली आहे.

Web Title: maharashtra news agriculture