शेतीच्या पाणीपट्टीत वाढीची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई  - जलसंपदा विभागामार्फत कृषी क्षेत्राला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दरात तब्बल 20 टक्के वाढ प्रस्तावित आहे. कृषी क्षेत्रफळानुसार आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीऐवजी आता पाण्याच्या वापरानुसार दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मुंबई  - जलसंपदा विभागामार्फत कृषी क्षेत्राला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दरात तब्बल 20 टक्के वाढ प्रस्तावित आहे. कृषी क्षेत्रफळानुसार आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीऐवजी आता पाण्याच्या वापरानुसार दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

राज्य सरकारने 2011 मध्ये कृषी, औद्योगिक, तसेच घरगुती वापरासाठी पाणीपट्टीचे दर ठरवले होते. या दरांत आता बदल करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने नवे दर ठरवले असून, त्यावर सूचना व हरकती मागवल्या आहेत. 2011च्या धोरणानुसार शेतीच्या क्षेत्रफळानुसार पाणीपट्टी आकारली जात होती; मात्र जलसंपदा विभागाने या धोरणात बदल करून पाण्याच्या वापरानुसार दर ठरवले आहेत. क्षेत्रफळानुसार दर आकारताना एखादा शेतकरी कमी पाणी वापरत असेल, तर त्याला ठराविक शुल्क द्यावे लागत होते. क्षेत्रफळाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्याला कमी शुल्क द्यावे लागत होते. पाणी वितरणात "ट्रान्सफॉर्मेशन'च्या नावाखाली राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित दरवाढीवर 31 ऑगस्टपर्यंत सूचना व हरकती पाठवायच्या आहेत. 

प्रत्येक थेंब मोजण्याची गरज 
पाण्याच्या प्रमाणानुसार शुल्क आकारायचे झाल्यास प्रत्येक थेंब मोजणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारकडे अशी यंत्रणा आहे का, हा प्रश्‍न आहे. भविष्यात संस्थांमार्फत पाणीपुरवठा करण्याचा सरकारचा विचार आहे. या संस्थांना मीटरने पाणीपुरवठा केल्यावर त्यांच्याकडून मीटरनुसार शुल्क आकारले जाईल. सध्या फक्त 25 ते 30 टक्के पाणीपुरवठा अशा संस्थांमार्फत केला जातो, अशी माहिती जलसंपदा विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. जलसंपदा विभागामार्फत पाणी दिल्या जाणाऱ्या महापालिका हद्दीतील घरगुती पाणीपट्टीत 14 टक्के, औद्योगिक वापरासाठी 38 टक्के आणि बॉटलिंग इंडस्ट्रीसाठी 588 टक्के वाढ प्रस्तावित आहे. 

सहा वर्षांनंतर पाणी महागणार  
2011 नंतर म्हणजेच सहा वर्षांनंतर राज्यातील पाणी महागणार आहे. यापूर्वी 29 जून 2011 मध्ये पाणीपट्टीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सहा वर्षांनी ही वाढ प्रस्तावित केली आहे. ही वाढ प्रस्तावित करताना जलसंपदा विभागाने महागाई निर्देशांकात 54.35 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. 

प्रस्तावित दर (विविध पाणीपुरवठ्याच्या प्रकारांनुसार किमान आणि कमाल दर) 

पालिका क्षेत्रातील घरगुती वापरासाठी 
- सध्याचे दर ः 10 हजार लिटरसाठी 70 पैशांपासून 4 रुपये 20 पैशांपर्यंत 
- प्रस्तावित दर ः 10 हजार लिटरसाठी 40 पैशांपासून 4 रुपये 80 पैशांपर्यंत 

कृषी दर (खासगी उपसा सिंचनासाठी) 
- सध्याचे प्रतिहेक्‍टरनुसार दर दीड हजार रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत 
(ऊस आणि केळी पिकांसाठी सर्वाधिक दर, तर रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी सर्वांत कमी) 
- प्रस्तावित दर प्रतिहजार लिटरसाठी 46 पैशांपासून 10 रुपये 96 पैशांपर्यंत 
(यात फळबागा, ऊस, केळी असा फरक वगळण्यात आला आहे. मोसमानुसार दर ठरवण्यात आले आहेत.) 
- प्रस्तावित दर प्रवाही सिंचनाकरता प्रति 10 हजार लिटरसाठी 13 रुपये 50 पैशांपासून तीन रुपये 60 पैसे 

Web Title: maharashtra news agriculture water