भामचंद्र डोंगर रात्रीत काळवंडला!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

आंबेठाण - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारा तसेच सदैव हिरवा गर्द असणारा भामचंद्र डोंगर अचानक लागलेल्या आगीत एका रात्रीत काळवंडला. शेकडो जीव आणि वनस्पती भस्मसात झाल्या आहेत. 

आंबेठाण - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारा तसेच सदैव हिरवा गर्द असणारा भामचंद्र डोंगर अचानक लागलेल्या आगीत एका रात्रीत काळवंडला. शेकडो जीव आणि वनस्पती भस्मसात झाल्या आहेत. 

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आणि नव्याने उदयास येत असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतींच्या टप्पा क्रमांक दोनपासून भामचंद्र डोंगर रांगेला सुरवात होते. पश्‍चिमेला जवळपास ५० किमी अंतरापर्यंत जाऊन सह्याद्रीच्या रांगाना भामचंद्र डोंगर जाऊन मिळतो. सदैव निसर्ग संपन्न असणाऱ्या या डोंगराला सध्या आगीचे ग्रहण लागले आहे. डोंगराच्या जवळपास तीन बाजूंनी कारखाने उभारले जात असल्याने या डोंगरावर मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा कारणातून या ठिकाणी आग लागल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

ही लागलेली आग विझविण्यासाठी चाकण वनविभागातील दोन कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना मदतीला घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. या वर्षी ठराविक अंतरात पाऊस पडल्याने डोंगरावर गवत मोठ्या प्रमाणात वाढले होते. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात अशा प्रकारे आगी लागत असल्याने वन्यजीव आणि वनस्पतींचे मोठे नुकसान होत आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात साधक राहत आहेत. त्यांच्याकडून येथील वन्य जिवांना सांभाळले जाते; परंतु अशा प्रकारे लागलेल्या आगीने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

जैवविविधतेचे नुकसान
डोंगरावर साग, ऐन, धावडा, शिवण, पांगारा, आवळा, आंबा, बिबवा, भावा, जांभुळ, अर्जुन, सादडा, शिसू, निलगिरी, सुबाभूळ अशी विविध प्रकारची आणि जवळपास दहा ते बारा मीटर उंचीची झाडे आहेत. याशिवाय करवंद, रमिडा यांची दोन ते चार मीटर उंचीची झाडे आहेत. तसेच शतावरी, मुरुडशेंग, निरगुडी, कोरपड अशा प्रकारच्या जवळपास एक मीटर उंचीपर्यंतच्या वनस्पती आहेत. माकड, सांबर, वानर, ससा, लांडगा, कोल्हा, तरस, रानमांजर, रानडुक्कर, मुंगूस असे शेकडो प्रकारचे पक्षी या ठिकाणी वास्तव्यास होते.

Web Title: maharashtra news Bhamchandra mountain