मुंबई-पुण्यावर सीसी टीव्हींची नजर 

सिद्धेश्‍वर डुकरे
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबई - राज्यातील स्मार्ट शहरांतील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारीला प्रतिबंध, दहशतवादी हल्ले, वाहतूक नियोजन व संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेले 15 हजारांहून अधिक सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यात हे काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील कामाचा तिसरा टप्पा लवकरच संपणार असून, 15 ऑगस्टपर्यंत ही यंत्रणा सुरू होईल. 

मुंबई - राज्यातील स्मार्ट शहरांतील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारीला प्रतिबंध, दहशतवादी हल्ले, वाहतूक नियोजन व संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेले 15 हजारांहून अधिक सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यात हे काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील कामाचा तिसरा टप्पा लवकरच संपणार असून, 15 ऑगस्टपर्यंत ही यंत्रणा सुरू होईल. 

काही स्मार्ट शहरांतील काम संपले आहे, तर काही शहरांत काम सुरू आहे. इतर शहरांतील कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या दहा शहरांत सुमारे 15 हजारांवर सीसी टीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील स्मार्ट शहरांवर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर पुढील काळात राहील. 

राज्यातील दहा शहरांचा स्मार्ट शहरे म्हणून केंद्र सरकारने समावेश केला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांची लोकसंख्या लक्षणीय आहे. मुंबई-पुणे-नाशिक या पट्ट्यात देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक येतात. शहरीकरणाचा वेग झपाट्याने होत आहे. त्यामुळे शहराकडे लोंढे येत आहेत. परिणामी, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांत अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांचे प्रमाण, प्रकार व स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ले यापूर्वीही झाले आहेत. अलीकडील काळात रेल्वे स्थानके, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, महिला व युवतींची छेडछाड, तसेच विनयभंगाचे प्रकार वाढत आहेत. यामुळे राज्य सरकारने सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यास प्राधान्य दिले आहे. 

यामुळे गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढेल. गुन्ह्यांची उकल करताना पुरावे मिळाल्यामुळे आरोपीला पकडणे सोपे होईल. संशयास्पद हालचाली टिपल्यामुळे संभाव्य धोके टाळता येतील. तसेच धार्मिक महोत्सव, दोन समाजांत तणाव निर्माण झाल्यास ती परिस्थिती हाताळण्यासाठी मदत होईल. या कॅमेऱ्यांची जाणीव झाल्यानंतर गैरकृत्ये करण्यास समाजकंटक धजावणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. 

राज्यात सीसी टीव्ही लावण्यासाठी सुरवात करताना लंडन शहरातील यंत्रणेची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घेऊन निविदा मागवून सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामास गती दिली. मुंबई आणि पुणे या शहरांतील यंत्रणा गृहखाते उभारत आहे. इतर आठ शहरांतील काम राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग करत आहे. सीसी टीव्ही कॅमेरे लावणे हे "स्मार्ट सिटी' संकल्पनेतही समाविष्ट आहे. 

मुंबई, पुणेवगळता इतर आठ स्मार्ट शहरांतील सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे काम माहिती व तंत्रज्ञान विभाग करणार आहे. या विभागाला नगरविकास विभाग मदत करील. इतर स्मार्ट शहरांतील नागपूरमधील प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्या आहेत. हे काम एल ऍण्ड टीला दिले आहे. काम सुरू झाले आहे. नाशिक, कल्याण-डोंबिवली, अमरावती, सोलापूर या शहरांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाले आहेत. 

असे आहे चित्र 
 मुंबई - मुंबई पोलिस आयुक्‍तालयाच्या अखत्यारीतील हद्दीत हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. तीन टप्प्यांत काम सुरू आहे. पहिले दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील काम संपत आले आहे. 15 ऑगस्टला मुंबईत ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू होईल. 

कॅमेऱ्यांची संख्या - 4417, एकूण ठिकाणे - 1510, एकूण खर्च - 945 कोटी, नियंत्रण कार्यालय - सध्या पोलिस मुख्यालय आणि वाहतूक शाखेचे सहआयुक्‍त, प्रस्तावित नियंत्रण कार्यालय - कालिना. 

पुणे - पुणे पोलिस आयुक्‍तालयाच्या अखत्यारीतील हद्दीत हे कॅमेरे लावले आहेत. काम पूर्ण होऊन ते सुरू झाले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसराचा यात समावेश आहे. कॅमेऱ्यांची संख्या - 1234, ठिकाणे - 425, एकूण खर्च - 225 कोटी. 

यंत्रणेबाबत कंपन्यांशी करार 
ही सर्व यंत्रणा हाताळण्याबाबत या कंपन्यांबरोबर करार करण्यात आला आहे. त्यानुसार पाच वर्षे दुरुस्तीचा खर्च संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्या करतील. या कंपन्यांनाच दुरस्ती करावी लागेल. ही सर्व यंत्रणा आणि तिच्या गुणवत्तेचे या क्षेत्रातील त्रयस्थ संस्थांकडून ऑडिट केले जाईल.

Web Title: maharashtra news cctv camera