रस्ते 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त - चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

लोकप्रतिनिधींनी कामात अडथळा आणला तर त्यांचे पद रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे, हे त्यांनी विसरू नये. 
- चंद्रकांत पाटील, मंत्री, सार्वजनिक बांधकाम खाते 

मुंबई - महाराष्ट्रातील राज्य महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू असून 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील. त्यासाठी मंत्रालयात वॉर रूम तयार करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. 7) दिली. 

मंत्रालयात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी उभारण्यात आलेल्या "संपूर्ण खड्डेमुक्ती वॉर-रूम'च्या पाहणीनंतर पाटील बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या "संपूर्ण खड्डेमुक्त वॉर-रूम'चा आढावाही त्यांनी घेतला. 

खड्डेमुक्तीसाठी वार्षिक देखभाल-दुरुस्तीची निविदा काढण्यात येणार आहे. 10 किलोमीटर रस्त्याची कामे दोन वर्षांसाठी संबंधित कंत्राटदारास देण्यात येणार आहेत. या कालावधीत या रस्त्याची जबाबदारी त्या कंत्राटदारावर असेल. राज्यात होणाऱ्या कामांची जिल्हानिहाय ऑनलाईन माहिती तसेच विभागनिहाय माहिती वॉर रूममध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाचा आढावा रोजच्या रोज घेतला जाणार आहे. खड्डे भरलेल्या रस्त्यांची छायाचित्रेही अपलोड करण्यात येत आहेत. त्यामुळे खड्ड्याची आधीची, खड्डे भरतानाची आणि भरल्यानंतरची स्थिती ऑनलाईन पाहता येईल असे पाटील यांनी सांगितले. 

या वेळी नाशिक आणि औरंगाबाद येथील कामकाजाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथील राज्य महामार्ग, राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्गांवरील कामकाजाचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. 

ज्या कंत्राटदारांनी रस्त्यांच्या कंत्राटांवर आपले बंगले बांधले आणि गाड्या घेतल्या, तेच आता या कामास आडकाठी करत आहेत. अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. नवीन जेट पॅचर मशीनच्या साह्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्यामुळे 1600 कोटींचे टेंडर थेट 400 कोटींवर आले आणि पैसे वाचले आहेत. कॉंट्रॅक्‍टरची दुकाने आता बंद होतील, असा दावा पाटील यांनी केला. 

 

Web Title: maharashtra news chandrakant patil Roads will be paved-free till December 15