तुपे, कारंडे, परब यांना यंदाचा डॉ. परुळेकर पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - ‘सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम’चे (एसआयटी) वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे यांना; तसेच ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे बातमीदार किरण कारंडे आणि हर्षदा परब यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 

पुणे - ‘सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम’चे (एसआयटी) वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे यांना; तसेच ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे बातमीदार किरण कारंडे आणि हर्षदा परब यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 

विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या ‘सकाळ’च्या बातमीदारांना दर वर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो. ‘सकाळ’चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या समारंभात प्रमुख पाहुण्या आणि भारतातील पहिल्या एमबीए पदवीप्राप्त सरपंच छवी राजावत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. ‘सामाजिक बदलाव में युवा शक्ति का महत्त्व’ या विषयावर या वेळी राजावत यांचे व्याख्यान होणार आहे. 

मुंबईतील वाळकेश्वर येथील ‘द लिजेंड टॉवर’चे वाढीव बेकायदा बांधकाम अधिकृत करण्याच्या प्रकरणात विकसक, म्हाडा आणि गृहनिर्माण विभाग; तसेच तेव्हाचे मुख्यमंत्री यांनी घाईघाईने पत्रव्यवहार केला होता आणि गृहनिर्माण विभागाने एका दिवसात हा प्रस्ताव मंजूर केला होता. तुपे यांनी हा गैरप्रकार उजेडात आणला व सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. मंत्र्यांच्या कार्यालयांना ‘माहिती अधिकार कायदा’ लागू व्हावा, यासाठीही तुपे यांनी प्रयत्न केले होते. त्याबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय झाला आणि मंत्र्यांनी दिलेली शिफारसपत्रे, त्यांचा पत्रव्यवहार, मंत्र्यांच्या कार्यालयांतील कर्मचारी यासंबंधीची माहिती थेट उपलब्ध होण्याची सोय झाली. 

किरण कारंडे आणि हर्षदा परब मुंबईमध्ये गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत आहेत. दोघेही मुद्रित माध्यमाबरोबरच डिजिटल माध्यमातून पत्रकारिता करीत आहेत. एकाच बातमीचे विविध पैलू दृश्‍य आणि मुद्रित माध्यमांची ताकद वापरून त्यांनी उलगडून दाखविले आहेत. सोशल मीडियामध्ये ‘लाइव्ह’ व्हिडिओच्या माध्यमातून बातमी सादरीकरणाचा नवा पैलू कारंडे आणि परब यांनी मराठी पत्रकारितेत आणला. मुंबई महापालिका निवडणूक रिंगणात उभ्या राहिलेल्या तृतीयपंथी उमेदवाराचा संघर्ष कारंडे आणि परब यांनी वाचकांसमोर मांडला. आराध्या मुळे या हृदयविकारग्रस्त तीन वर्षे वयाच्या बालिकेवरील हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी त्यांनी मुद्रित, ऑनलाइन आणि सोशल मीडियाद्वारे कॅम्पेन राबविली. मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचे सोशल मीडियावर त्यांनी केलेले वार्तांकन अनेक मुंबईकरांना उपयोगी पडले. 

विशेष काम करणाऱ्यांचा गौरव
लोकसमूह एकत्र आले आणि त्यांना नेतृत्व मिळाले, तर एरवी अशक्‍य वाटणारे बदल घडून येतात, हे भाऊ मरगळे, संतोष टिकेकर, गंगूबाई आंबेकर या सरपंचांनी, मोठ्या पगाराची नोकरी सोडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ करणारे अशोक आणि अर्चना देशमाने; तसेच अपघातग्रस्त तरुणाला वेळेवर मदत करणाऱ्या सानिया कुलकर्णी, ऋतुजा बुडुख, रझिया खान यांनी सिद्ध केले आहे. ‘सकाळ’चे संस्थापक- संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. २०) या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

राजस्थानमधील सोडा या गावाच्या, एमबीए पदवी असलेल्या भारतातील पहिल्या महिला सरपंच छवी राजावत यांचे व्याख्यान डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त आयोजिले आहे. ‘सामाजिक बदलाव में युवा शक्ती का महत्त्व’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. हे व्याख्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता होत आहे. या समारंभात या सर्वांचा सत्कार राजावत त्यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: maharashtra news Dr. Nanasaheb Parulekar Award sakal