सायबर कायद्याच्या अभावी एक वर्ष भोगतोय - खडसे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यात सरकार संपूर्णतः अयशस्वी ठरले असल्याचा घरचाच आहेर माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिला. 

मुंबई - सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यात सरकार संपूर्णतः अयशस्वी ठरले असल्याचा घरचाच आहेर माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिला. 

प्रश्‍नोत्तराच्या तासादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आज उत्तर देत होते. सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी हाती घेतलेल्या सुरक्षा प्रकल्पाबाबत बाळासाहेब थोरात यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना रणजित पाटील यांनी राज्यात 47 सायबर लॅब स्थापल्या आहेत, गेल्या वर्षात सात हजार 119 गुन्हे नोंदवले गेले, अशी माहिती देऊ लागले. त्यावर समाधान न झालेल्या सदस्यांनी प्रश्‍न विचारण्यास प्रारंभ केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुनील केदार आदी सदस्यांनी सायबर गुन्ह्यांबाबत प्रश्‍न उपस्थित केले. तेवढ्यात सत्तारूढ बाकांवरून एकनाथ खडसे उभे राहिले. ""महाराष्ट्राच्या सायबर कायद्यात अनेक त्रुटी आहेत. भांगळे याने केलेल्या आरोपांमुळे माझे संबंध थेट दाऊद आणि त्याच्या पत्नीशी जोडले गेले. अशा गुन्ह्यांबाबत योग्य कायदे नाहीत, गृहराज्यमंत्री पाटील केवळ पाच टक्के गुन्ह्यांची उकल झाली असे म्हणताहेत, हे चिंताजनक आहे, असा घरचा आहेर त्यांनी दिला. 

खडसे यांच्या या हल्ल्याला प्रतिसाद मिळत असतानाच ते पुढे म्हणाले, "विधिमंडळातल्या महिला सदस्यांवर केलेली अश्‍लील टीका सायबर क्राइम विभागाला कशी चालते? या राज्यात महिला आमदार सुरक्षित नसतील तर अन्य भगिनींची काय स्थिती असेल?' त्यांच्या या विधानाला पाठिंबा देत कॉंग्रेसच्या महिला आमदारांनी "शेम'च्या घोषणा सुरू केल्या. "भांगळेच्या खोट्या आरोपांमुळे मी गेले वर्षभर भोगतोय,' अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. 

"या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता प्रश्‍न राखून ठेवा,' अशी मागणी सदस्य करत होते; पण अध्यक्ष बागडे यांनी या गदारोळातच पुढचा प्रश्‍न पुकारला. मुख्यमंत्री फडणवीस हे राष्ट्रपती कोविंद यांच्या शपथविधीला दिल्लीत गेले असताना खडसे यांनी धारण केलेले आक्रमक रूप चर्चेचा विषय होते. 

Web Title: maharashtra news Eknath Khadse