बनावट नियुक्तिपत्राने राज्यातील तरुणांना गंडा 

योगिराज प्रभुणे
शुक्रवार, 21 जुलै 2017

पुणे - "तुम्हाला वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळणार आहे, पाच लाख रुपये द्या', असे आमिष दाखवून राज्यातील अनेक तरुणांना लुबाडण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भारतीय जनता पक्षाचा मुंबईतील एक कार्यकर्ताच या टोळीचा प्रमुख असल्याचा संशय फसवणूक झालेल्या एका तरुणाने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे हुबेहूब लेटरहेड वापरून तरुणांना वेगवेगळ्या नियमित नियुक्तीचे बनावट पत्रही देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

पुणे - "तुम्हाला वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळणार आहे, पाच लाख रुपये द्या', असे आमिष दाखवून राज्यातील अनेक तरुणांना लुबाडण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भारतीय जनता पक्षाचा मुंबईतील एक कार्यकर्ताच या टोळीचा प्रमुख असल्याचा संशय फसवणूक झालेल्या एका तरुणाने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे हुबेहूब लेटरहेड वापरून तरुणांना वेगवेगळ्या नियमित नियुक्तीचे बनावट पत्रही देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

राज्यातील वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणी वर्गातील नोकरीचे आमिष दाखवून लातूर, कोल्हापूर, बीड, सोलापूर अशा वेगवेगळ्या भागांतील तरुणांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये गोळा केले. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात 30 जणांना, तर कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 26 जागांवर कायमस्वरूपी नोकरी लागल्याची यादीही या तरुणांना दाखविण्यात आली, अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली. 

या प्रकरणात फसवणूक झालेले नारायण डोंगरे (रा. महाळंगी, चाकूर, जि. लातूर) यांनी "सकाळ'ला सांगितले, ""जिल्हा रुग्णालयातील एका मध्यस्थाने माझ्याशी संपर्क साधला आणि "वैद्यकीय शिक्षण- संशोधन विभागात काम करणाऱ्या करार तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडल्या आहेत; पण आता या जागांवर नियमित पदे भरण्यात येत आहेत. त्यातील 80 टक्के पदे शासन भरणार आहे', असे मला सांगितले. तसेच, त्यासाठी त्या मध्यस्थाने सहा लाख रुपयांची मागणी केली. दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला कामावर रुजू करून घेऊ, असेही त्याने सांगितले. त्याला पैसे दिल्यानंतर पाच- सहा महिने झाल्यानंतरही कामावर नियुक्तीचे पत्र मिळत नसल्याने पैसे परत करण्याचा तगादा मी त्याच्याकडे लावला; पण तुमच्याबरोबर तुमच्या भावाचेही काम करणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी ससून रुग्णालयात तुमच्या नावांची यादी लागली असल्याचा निरोप त्याने फोनवरून दिला. तसेच त्याने महाविद्यालयाच्या सूचनाफलकावर लावलेल्या यादीचे छायाचित्रही व्हॉट्‌सऍपद्वारे पाठविले. त्यामुळे ही यादी पाहण्यासाठी पुण्यात आलो. महाविद्यालयाच्या सूचना फलकावर ती यादी होती; पण ती अधिकृत नसल्याचे येथे स्पष्ट झाले, त्यामुळे आपण आता फसले गेल्याचे माझ्या लक्षात आले.'' 

डोंगरे म्हणाले, ""मी साडेतीन लाख रुपये "ऑनलाइन ट्रान्सफर' केले, तर तीन लाख रुपये रोख रक्कम संबंधित मध्यस्थाला दिली. हे पैसे मी खासगी सावकाराकडून तीन टक्के व्याजाने आणले होते. आता नोकरी नाही आणि पैसेही नाहीत, अशी माझी अवस्था झाली आहे.'' 

लातूरमधील मध्यस्थाने मुंबईतील भाजपच्या एका कार्यकर्त्याला हे पैसे दिले असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्याच्या वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांच्या नावाने संचालकांनी दिलेल्या बनावट पत्राची प्रत मिळाली असल्याचेही डोंगरे यांनी स्पष्ट केले. या कार्यकर्त्याचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक असलेला कागद या तरुणाकडे आहे. मात्र, त्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क होऊ शकत नाही, तर लॅंडलाइन क्रमांक उचलला जात नाही, असा अनुभव त्याला आला. या क्रमांकाची ट्रू कॉलर ऍपद्वारे तपासणी केली असता या कार्यकर्त्याचेच नाव येत असल्याने पोलिसांना त्याचा तपास करता येईल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. 

बनावट लेटर हेड आणि स्वाक्षरी 
नियुक्तिपत्रासाठी वापरण्यात आलेले वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे लेटरहेड बनावट असल्याचे बी. जे.च्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यात वापरलेली भाषाही सरकारी नाही. तसेच, स्वाक्षरीही संचालकांची नसल्याचे यातून स्पष्ट झाले. 

रात्री दीड वाजता लावली यादी 
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूचना फलकावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास यादी लावल्याचे "सिसीटीव्ही'मध्ये दिसून आले. त्यात दोन जण रात्री महाविद्यालयात आले. त्यांनी सूचना फलकावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी लावली आणि त्याचा मोबाईल कॅमेऱ्यातून फोटोही काढला. 

""बनावट नियुक्ती प्रकरणाच्या चौकशीसाठी कोल्हापूर आणि सोलापूरचे पोलिस आले होते; पण ही जाहिरात आमच्या खात्याने काढलेली नाही. नियुक्तिपत्र आम्ही दिलेले नाही. त्यावरची स्वाक्षरी माझी नाही. त्यामुळे आमचा याच्याशी कोणताही संबंध नाही.'' 
- डॉ. प्रदीप शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, महाराष्ट्र राज्य 

Web Title: maharashtra news Fake appointment letter crime