शेतकरी कर्जमाफीवरून राज्यभरात चक्काजाम

टीम ई सकाळ
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाटी आता 'आरपार'ची लढाई छेडणार असल्याचा इशारा सुकाणू समितीने या वेळी दिला आहे. सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली; मात्र यामध्ये शेतकऱ्यांना लाभ होणार नाही, यासाठी सतत बदल करत सरकारने थट्टा लावली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन फॉर्म भरून घेताना शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत.

पुणे : शेतकरी कर्जमाफी व हमीभाव यावरून शेतकरी संघटनांना दिलेल्या आश्वासनाची सरकारने पूर्तता केली नसल्याचा आरोप करत आज (सोमवार) राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्वच भागात सुकाणू समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाटी आता 'आरपार'ची लढाई छेडणार असल्याचा इशारा सुकाणू समितीने या वेळी दिला आहे. सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली; मात्र यामध्ये शेतकऱ्यांना लाभ होणार नाही, यासाठी सतत बदल करत सरकारने थट्टा लावली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन फॉर्म भरून घेताना शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. केवळ कागदावर असलेल्या कर्जमाफीचा ढोल पिटत सरकरा स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, असा आरोप सुकाणू समितीने पत्रकातून केला आहे. शेतकरी सुकाणू समितीला एका महिन्यात हमीभाव कायद्यात बदल करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; मात्र विधिमंडळ अधिवेशन संपले तरी सरकारने यामध्ये कोणताही बदल केला नाही, त्यामुळे सुकाणू समितीला आता परत संघर्ष करण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. 

पश्चिम महाराष्ट्रात रास्ता रोको
पश्चिम महाराष्ट्रात आज सुकाणू समितीच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात 12 ठिकाणी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन समितिच्या शिफारशी लागू कराव्या अशा मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनांच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते कमी आणि पोलिस जास्त असे चित्र पहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातही माढा, पंढरपूर, बार्शीमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केले.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आंदोलन
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे शेतकऱ्यांना जाचक अटी न लावता सरसकट कर्जमूक्त करा, शेतमालाला रास्तभाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शीफारशीची अंमलबजावणी करा, सोयाबीन व कापसाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या सुत्राप्रमाणे हमीभाव द्यावा,  शेतकरी व शेतमजूरांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या या व इतर मागण्यांसाठी खामगाव शहरातील अकोला मार्गावर टेंभूर्णा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभीमानीचे नेते खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर, कैलास फाटे, डॉ. कविश्वर, दादा रायपुरे यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता.

शेतकऱ्यांच्या मोर्च्याने दीड तास रोखली वाहतूक
आमच्या गायीच्या दुधापेक्षा रामदेवबाबा विकत असलेल्या गायीच्या मूत्राला अधिक भाव मिळतो आहे. शेतकरी बांधवांनो ही आपली थट्टा असून शासनाची मस्ती जिरवण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पेटून उठावे. विराट कोहलीच्या धावा मोजण्यापेक्षा शेतात राबणाऱ्या आपल्या बापाच्या धापा मोजा आणि शेत मालाला हमी भाव शासनाने द्यावा यासाठी रस्त्यावर उतरावे. शेतकऱ्यांमध्ये फूट पडणाऱ्या शासनाचा धिक्कार करावा अशी हाक किसान क्रांती मोर्च्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत देण्याती आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आर. के. पाटील यांनी हे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून वाहतूक रोखून धरली. यावेळी दोनशे शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी मिळावी आमचा सातबारा कोरा करावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणी करावी यासाठी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. किसान क्रांतीचे तालुका समनव्यक विवेक रणदिवे यांनी सांगितले, देशात सर्व विमे काढण्यासाठी एजंट घरी येतो. मात्र बळीराजाला विमा साठी रांगेत मरेपर्यंत उभे राहावे लागते ही चेष्टा आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा. बिनव्याजी कर्ज साठ वर्षांनंतर पेंशन मिळावी. दुधाला पन्नास रुपये लिटर भाव मिळावा. अखंड व मोफत वीजपुरवठा मिळावा ठिबक व तुषारला शंभर टक्के अनुदान देण्यात यावे. या मागण्याचा पनुरुच्चर यावेळी केला. आंदोलनात या रयत सेनेचे गणेश पवार लोकसंघर्ष मोर्चाचे अतुल गायकवाड, सह्याद्री प्रतिष्टानचे दिलीप घोरपडे या संघटनांनी सहभाग घेतला. दडपिंप्री आडगाव टाकली पिलखोड शिरसगाव ब्राह्मण सेवगे देवळी या परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलने
नाशिक जिल्ह्यात सुकाणू समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.  त्र्यंबकेश्वर येथील रस्त्यावर सुकाणू समितीतर्फे शेतकरी कर्जमाफीसाठी रस्ता रोको करण्यात आला. सातबारा कोरा करावा यासाठी ट्रॅक्टर आणि बैलं रस्त्यावर उभे करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद-नाशिक रस्त्यावर निफाड़ तालुक्यातील चांदोरी चौफूलीवर शेतकरी वर्गाने आंदोलन केले. आंदोलनात निफाड तालुक्यातील मोठ्यासंख्येने शेतकरी सहभागी झाले होते. सुकाणु समिती सदस्य करण गायकर, मा. आमदार दिलिप बनकर, जि. प. सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, अनिल कुंदे, धोंडिराम रायते यांचा आंदोलनात सहभाग मोठी वाहतुक कोंडी झाली होती. आंदोलन सुरू असताना रूग्णवाहिकेला जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्यात आली. मोठा पोलिस बंदोबस्त होता. 

मराठवाड्यातही आंदोलनाचे पडसाद
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मराठवाड्यातही पडसाद पहायला मिळाले. औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. अर्धापूर येथे नांदेड-नागपूर महामार्गावर भोकरफाटा येथे सुकाणू समितीच्यावतीने सरसगट कर्जमाफीसाठी रास्त रोको आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील हरंगूळ येथे, बीड जिल्ह्यात सिरसाळा व माजलगाव येथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ढोकी (ता. उस्मानाबाद) येथे शेतकरी सुकाणु समितीच्या वतीने पाऊणतास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

Web Title: Maharashtra news farmer agitation in maharashtra