दहा हजार रुपयांचे कर्ज देण्याची प्रक्रिया तातडीने करा - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 जून 2017

बॅंकांनी शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात संवेदनशीलपणे कार्यवाही करावी. शेतकऱ्यांकडून केवळ स्वयंघोषणापत्र घेऊन 10 हजार रुपयांचा तातडीचा कर्जपुरवठा करावयाचा आहे. केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती शासनाकडे जमा केल्यानंतर तातडीने बॅंकांना व्याजासह परतावा दिला जाईल. 
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

मुंबई - राष्ट्रीयीकृत बॅंका, व्यावसायिक बॅंका, राज्य सहकारी बॅंक, जिल्हा सहकारी बॅंका व अन्य बॅंकांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेले दहा हजार रुपयांचे कर्ज त्वरित देण्याची प्रक्रिया करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 

राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची विशेष बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली "सह्याद्री' अतिथीगृहात पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेनंतर त्याची अंमलबजावणी त्याच गतीने होण्याची आवश्‍यकता असते, त्यामुळे या कर्जपुरवठ्यासाठी बॅंकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, दहा हजार रुपयांचे तातडीच्या मदत स्वरूपातील कर्ज हे प्रत्येक पीककर्ज खाते असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावयाचे आहे. शेतकऱ्याच्या खाती जमा करावयाची दहा हजार रुपयांची राज्यातील एकूण रक्कम खूप अल्प असून, राज्य शासनाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने बॅंकांना शासनामार्फत त्वरित परतावा दिला जाईल. 

या वेळी राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने माहिती देण्यात आली की, निश्‍चलनीकरणानंतर राज्यातील जिल्हा सहकारी बॅंकांतील जुन्या नोटा 30 दिवसांत स्वीकारण्यात येतील, अशा स्वरूपाचे पत्र रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने प्राप्त झाल्याने 10 हजार रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बॅंकांतून लवकरच देण्याची प्रक्रिया होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Web Title: maharashtra news farmer emergency loans Devendra Fadnavis