कर्जमाफी द्या, जगण्यासाठी शेतकऱ्यांना संप करावा लागणे वाईट- नाना पाटेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

तुम्हाला प्रॉब्लेम काय?
आम्हीही चांगले कपडे घातले, आमच्याकडेही चांगली गाडी असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असण्याचं कारण काय? असा थेट सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. त्यांना जितकं जास्त दडपण्याचा प्रयत्न कराल, तर ते वाफेप्रमाणे तितक्याच जास्त जोराने बाहेर पडेल. 

मुंबई : "शेतकरी संघटित होत आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. जगण्यासाठी शेतकऱ्यांना संप करावा लागतोय हे अत्यंत वाईट आहे," अशा शब्दांत उद्विग्नता व्यक्त करत 'गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे,' अशी मागणी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी केली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी इच्छा व्यक्त करतानाच मकरंद अनासपुरे म्हणाले, "सरकारने शेतकऱ्यांचा फुटबॉल करू नये. आणि शेतकऱ्यांच्या या दुःखावर बोलण्यासाठी सेलिब्रिटी का पुढे येत नाहीत," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच, स्वामिनाथन आयोग लागू करावा अशी नाम संस्थेच्या वतीने मागणी करण्यात आली.

राजकारणात जाऊ नये
कलावंतांनी राजकारणात जाऊ नये असं मला वाटतं. कारण पक्षाची मिरासदारी तुम्हाला करावी लागते. अशी उत्स्फूर्तपणे मतं मांडता येत नाहीत. शेतकरी असेल किंवा दलित असतील त्यांचा लाभ उठवणारे राजकारणी असतातच. ते आपल्याला माहीत आहे. शेतकरी संघटनेच्या लोकांनी सरकारमधील पदे स्वीकारू नयेत, राजकारणात जाऊ नये. शेतमालाची नासाडी होणं हे मला पटत नाही. परंतु, शेतकऱ्यांचा हा उद्रेक आहे. तो उद्रेक अशा पद्धतीने दर्शवत असतील, असे त्यांनी सांगितले. 

हमीभाव द्या 
एकदा हमीभाव ठरविल्यावर शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी सुटण्यास मदत होईल. शेतमालाला हमीभाव द्यायला हवा. सरकारकडे तेवढी गोदामे असायला हवी आहेत. हमीभावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी माल न घेतल्यास त्यावर सरकारने उपाय करायला हवा. सरकारने तो शेतमाल खरेदी करायला पाहिजे. 

आम्ही या विषयातील तज्ज्ञ नाही, पंरतु शेतकऱ्यांना होणाऱ्या वेदना होऊ नयेत असं आम्हाला वाटतं. फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सहानुभूतीने विचार करायलाच पाहिजे. ते तसा साकल्याने सहानुभूतीने विचार करतील असं वाटतं. 
 

Web Title: maharashtra news farmers strike nana patekar, makrand anaspure loan waiver demand