मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

राज्यभरात... 
- राज्यात आणखी दोन दिवस राहणार पावसाचा जोर 
- धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ; विसर्ग सुरू 
- पाणीपातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये दक्षता 
- मराठवाड्याला दिलासा, विदर्भाला मुसळधारेची अपेक्षा 
- विदर्भातील धरणांमध्येही समाधानकारक साठा 
- नागपूरमध्ये विमान वाहतूक विस्कळित 
- कोकणात काही ठिकाणी भातपिकाचे नुकसान 
- मराठवाडा, विदर्भातील कापूस, तूर, मूग, बाजरी पिकांना दिलासा 

पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सुरू झालेली पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) सुरू राहिली. येत्या गुरुवारी (ता. 21) कोकण गोव्याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. 

राज्याच्या बहुतांश भागात गेल्या चोवीस तासांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तळकोकणाला तर मुसळधार पावसाने झोडपले आहे. महाबळेश्‍वर, गगनबावडा, राधानगरी, ताम्हिणी अशा घाटमाथ्यांवर पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत असून कोयना, जायकवाडी, उजनी, भंडारदरा, खडकवासला, गंगापूर आदी धरणांच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश धरणे भरली असून, धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे. 

मुबईसह कोकण किनारपट्टीवर सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम होता. सोसाट्याचा वारा आणि मुसाळधार पावसाने कोकणाला झोडपले असल्याची माहिती हवामान खात्यातून देण्यात आली. काही ठिकाणी भातपिकांचे नुकसान झाले. मुसळधार झालेल्या पावसामुळे कोकणातील विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, भांडूप, तुलसी, वैतरणा, अप्पर वैतरणा ही धरणे भरली असून, पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

मध्य महाराष्ट्रातही पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, शिरूर, साताऱ्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कोयनागर, कोल्हापुरातील काही भाग, नगरमधील अकोले तालुक्‍यातील काही भाग, राहुरी, नाशिकमधील इगतपुरीतील काही भागांत हलक्‍या सरी बरसत होत्या. उर्वरित भागांत हवामान ढगाळ होते. राधानगरी परिसरात चार तासांमध्ये 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाडा व विदर्भातही काही भागात हवामान ढगाळ होते. काही काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते. 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळांत पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्याने मराठवाड्याला काहीसा दिलासा मिळाला. उर्वरित भागांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली होती. विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर भागांत हवेचे दाब कमी झाल्यामुळे या जिल्ह्यांतील तीन मंडळांत अतिवृष्टी झाली. वर्धा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, काही ठिकाणी हवामान ढगाळ होते. त्यामुळे कापूस, तूर पिकांना दिलासा मिळाला. तर बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यांतील काही मंडळांत हलका पाऊस पडला. अकोला जिल्ह्यात हवामान ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडले होते. सध्या विदर्भात तूर, कापूस, बाजरी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. 

मध्य भारतातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच पश्‍चिम बंगाल, आसाम, मेघालय, बिहार, ओडिशा, सिक्कीम, त्रिपुरा, छत्तीसगडच्या काही भागांत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या देशातील अनेक भागांत हवेचे दाब कमी झाले आहेत. त्यामुळे छत्तीसगड, कोकण, गोवा या परिसरांत पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. तसेच मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील काही भागांतही पाऊस सक्रिय होत आहे. 

Web Title: maharashtra news heavy rain mumbai konkan maharashtra