जयप्रभा स्टुडिओचा ‘हेरिटेज’ दर्जा कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई - कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या ‘हेरिटेज’ (पुरातन वास्तू) दर्जाला विरोध करीत लता मंगेशकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका अखेर मागे घेतली. त्यामुळे उच्च न्यायालयाने स्टुडिओला दिलेला पुरातन वास्तू दर्जाबाबतचा निर्णय कायम राहणार आहे.

मुंबई - कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या ‘हेरिटेज’ (पुरातन वास्तू) दर्जाला विरोध करीत लता मंगेशकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका अखेर मागे घेतली. त्यामुळे उच्च न्यायालयाने स्टुडिओला दिलेला पुरातन वास्तू दर्जाबाबतचा निर्णय कायम राहणार आहे.

कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओची आपल्या मालकीची जमीन हडपण्याच्या हेतूनेच सरकारने त्याला पुरातन वास्तूचा दर्जा देण्याचा घाट घातल्याचा आरोप मंगेशकर यांनी याचिकेद्वारे केला होता. मंगेशकर यांनी या प्रकरणी २०१३ मध्येच याचिका दाखल केली होती. मात्र याचिकेत दुरुस्ती करत नगररचना विभागाच्या उपसंचालकांना दिलेल्या अधिकाराला आव्हान दिले होते. सरकार, कोल्हापूर पालिकेने आपल्याला नोटीस पाठवली नाही, असा दावा मंगेशकर यांनी याचिकेत केला होता. 

स्टुडिओमध्ये काही मंगेशकर यांच्या वतीने पत्रे लावण्यात आली होते. ती हटवण्याची नोटीस मंगेशकर यांना देण्यात आली होती. त्यात राज्य सरकारने स्टुडिओ ‘हेरिटेज’मध्ये समाविष्ट केल्याचेही नमूद करण्यात आले होते. शिवाय राज्य सरकारने सर्वप्रथम यादी तयार करण्यास सांगितल्यावर ती तयार करण्यात आली आणि ती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मंगेशकर यांना स्टुडिओ ‘हेरिटेज’ यादीत समाविष्ट आहे याची जाणीव होती, असा युक्तिवाद पालिकेच्या वतीने पटवून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने जयप्रभा स्टुडिओला ‘हेरिटेज’ दर्जा दिला होता. या निर्णयाविरोधात लता मंगेशकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. आता लता मंगेशकरांनी याचिका मागे घेत माघार घेतल्याने जयप्रभा स्टुडिओ हेरिटेजच राहणार आहे. 

Web Title: maharashtra news Jayaprabha Studio lata mangeshkar