"कास' जपण्यासाठी हवे नियंत्रित पर्यटन! 

शैलेंद्र पाटील
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

सातारा - कास पठार हा जागतिक निसर्ग वारसा आहे. त्याच्या संवर्धनासाठी उपाय योजताना केवळ "पठार' एवढ्या मर्यादित अर्थाने विचार न करता पठाराच्या परिघातील पाच किलोमीटरच्या परिघाचा विचार व्हावा. या झालर क्षेत्रातील मानवी हस्तक्षेपावर मर्यादा घालावी. तसेच येथे नियंत्रित पर्यटनालाच उत्तेजन द्यावे; अन्यथा पठाराचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जाण्याचा धोका संभवतो, असा निर्वाणीचा इशारा पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी "कास'च्या अनुषंगाने दिला आहे. 

सातारा - कास पठार हा जागतिक निसर्ग वारसा आहे. त्याच्या संवर्धनासाठी उपाय योजताना केवळ "पठार' एवढ्या मर्यादित अर्थाने विचार न करता पठाराच्या परिघातील पाच किलोमीटरच्या परिघाचा विचार व्हावा. या झालर क्षेत्रातील मानवी हस्तक्षेपावर मर्यादा घालावी. तसेच येथे नियंत्रित पर्यटनालाच उत्तेजन द्यावे; अन्यथा पठाराचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जाण्याचा धोका संभवतो, असा निर्वाणीचा इशारा पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी "कास'च्या अनुषंगाने दिला आहे. 

कास पठारावर सध्या रंगांचा उत्सव सुरू आहे. या अलौकिक पठाराची अनुभूती घेण्यासाठी हजारो निसर्गप्रेमी कासला पायधूळ झाडून जात आहेत. "वीकेंड'ला, कालच्या शनिवार-रविवारी सुमारे दहा हजार लोकांचा म्हणजे कास पठाराच्या धारण क्षमतेच्या दुप्पट गर्दी होती. ही गर्दी, वाहतुकीचा ताण, त्यातून होणारा गोंगाट, परिसरात होणारी व झालेली अनियंत्रित बांधकामे यांचा त्रास "कास'च्या जैवविविधतेवर होत आहे. या अनुषंगाने पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासकांनी महत्त्वाची निरीक्षणे मांडली आहेत. 

कासला 2013 मध्ये "युनेस्को'चा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल करण्यात आला. त्यानंतर गेल्या चार वर्षांत पर्यटकांच्या लाखोंच्या संख्येच्या राबत्यामुळे पठार व त्यावरील अतिसंवेदनशील वनस्पतींवर काय परिणाम झाला, याचा अभ्यास झालेला नाही. तो झाल्यास शासनाला कास पठारावर होणारे दुष्परिणाम शोधून त्यावर उपाययोजना करणे शक्‍य होणार आहे. दुर्मिळ अशा 30 टक्के प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातींची संख्या हा "युनेस्को'चा वारसा स्थळाचा दर्जा देण्याचा एक निकष आहे. पठारावर 2013 मध्ये अशा 70 टक्के प्रदेशनिष्ठ वनस्पती आढळून आल्या. आज त्यांची काय स्थिती आहे, या अभ्यास झाला पाहिजे. 

कास पठाराच्या जतनाचा विचार करताना तो केवळ पठारापुरता मर्यादित अपेक्षित नाही. या पठाराच्या किमान पाच किलोमीटर त्रिज्येचा भाग झालर क्षेत्र म्हणून जाहीर होणे गरजेचे आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मोठी बांधकामे, ओढा वळविणे, सांडपाणी उघड्यावर सोडणे, मातीसाठी डोंगर उकरणे, कुंपणासाठी होल पाडून सिमेंट किंवा लोखंडी डांब रोवणे, त्याला रंग देणे, सपाटीकरण आदींना पायबंध बसू शकेल. 

हे पठार अतिसंवेदनशील असल्यामुळे प्रदूषण झाल्यास तेथील हवामानावर परिणाम होऊन तेथील दुर्मिळ वनस्पती धोक्‍यात येऊ शकतात. त्या दृष्टीने पठारापासून तीन किलोमीटर दूर पार्किंग असावे. पर्यटकांना तेथे चालत जाण्याचे बंधन असावे. यात ज्येष्ठ नागरिकांना सवलत देता येईल. कास तलाव व बामणोलीकडे जाणारी रहदारी घाटाई वळणरस्त्याने पाठवावी, तसेच पठारावर इतर वाहनांना प्रवेश बंद करावा, अशा सूचना पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडल्या आहेत. 

काही प्रजातींची संख्या घटून पठारावरील फुलांची विविधता लोप पावत आहे. फुले कमी झाली नाहीत, तर ही विविधता कमी होत आहे. ही विविधता जपण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. 
प्रा. डॉ. विश्‍वास देशपांडे, निसर्ग अभ्यासक, सातारा. 

पर्वतीय किंवा संरक्षित प्रदेशात मानवी व्यवहारांविषयी नियमावली असली पाहिजे, ज्याची कास परिसरात उणीव भासते. 
- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा. 

"वीकेंड'ला "ऑनलाइन' प्रवेश निश्‍चित केलेल्यांनाच परवानगी असावी. पठाराच्या धारण क्षमतेनुसार तीन हजारांहून अधिक पर्यटकांना प्रवेश नको. 
- प्रा. शेखर मोहिते, वनस्पती शास्त्रज्ञ, सातारा 

Web Title: maharashtra news Kaas Pathar Tourism