‘माझी कन्या भाग्यश्री’ नव्या रूपात - पंकजा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई - महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना दीडच वर्षात पूर्णपणे बदलावी लागली आहे. या योजनेच्या पहिल्या वर्षी एकही लाभार्थी न मिळाल्याने अखेरीस या योजनेच्या अनाकलनीय अटी व नियम बदलण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली. १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख ५० हजारापर्यंत आहे, अशा समाजातील सर्व घटकांना ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

मुंबई - महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना दीडच वर्षात पूर्णपणे बदलावी लागली आहे. या योजनेच्या पहिल्या वर्षी एकही लाभार्थी न मिळाल्याने अखेरीस या योजनेच्या अनाकलनीय अटी व नियम बदलण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली. १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख ५० हजारापर्यंत आहे, अशा समाजातील सर्व घटकांना ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

मुलीचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणास प्रोत्साहन, मुलीच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी दीड वर्षापूर्वी पंकजा मुंडे यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना जाहीर केली होती. मात्र या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षभरात जन्म झालेल्या एकाही कन्येच्या पालकांच्या बॅंकेच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झालेले नव्हते. इतकेच नव्हे तर या योजनेसाठी राखून ठेवलेला २५ कोटींचा निधीही वाया गेला असून, या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विविध जिल्ह्यांमधून २०० अर्ज आले. मात्र अनाकलनीय नियम आणि अटींमुळे एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज मंजूर केले नव्हते. पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळी पाच हजार रुपये द्यायचे की मुलगी दुसरी असेल तरी पाच हजार द्यायचे किंवा कसे? कितव्या अपत्यानंतर मातेच्या शस्त्रक्रिया नियोजनाचे प्रमाणपत्र आवश्‍यक ठरणार? या योजनेअंतर्गत आजी - आजोबांना पाच हजार रुपयांपर्यंतचे सोन्याचे नाणे दिले जाणार आहे. पण आजी - आजोबा म्हणजे कन्येच्या वडिलांचे की आईचे? हे प्रश्‍न जिल्हाधिकाऱ्यांना पडत होते. त्यामुळे या योजनेचे लाभ मिळण्यास अडचणी येत होत्या.

आता या योजनेतील त्रुटी कमी करून ती अधिक सोपी केली आहे. नव्या योजनेनुसार एका मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे ५० हजार रुपये बॅंकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येणार आहेत. ५० हजार रकमेवर सहा वर्षांसाठी होणारे व्याजच मुलीच्या वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल. मुदलाची ५० हजार रुपयांची गुंतवणूक करून सहा वर्षांसाठी मिळणारे व्याज मुलीच्या वयाच्या १२ व्या वर्षी काढता येईल. तसेच पुन्हा मुद्दल ५० हजार रुपये गुंतवून सहा वर्षांसाठी मिळणारे व्याज अधिक मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या १८ व्या वर्षी काढता येणार आहे. माता किंवा पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर रक्कम देण्यात येणार आहे.

दोन मुलींनंतर लाभ... 
दोन मुलींनंतर प्रत्येकी २५ हजार रुपये बॅंकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येणार. मुलींचे वय ६, १२ वर्षे अशा दोन टप्प्यांत २५ हजाराचे व्याज आणि १८ व्या वर्षी २५ हजार आणि व्याज माता किंवा पित्याने शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर दोन्ही मुलींना देण्यात येणार असल्याची माहिती या वेळी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra news pankaja munde girl