राज्यात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकारदेखील पेट्रोल दोन रुपयांनी आणि डिझेल एक रुपयांनी कमी करणार आहे. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी "ट्विट' केले. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत मंजूर होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकारदेखील पेट्रोल दोन रुपयांनी आणि डिझेल एक रुपयांनी कमी करणार आहे. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी "ट्विट' केले. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत मंजूर होण्याची शक्‍यता आहे. 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक पेट्रोलवर 26 टक्के, तर डिझेलवर 25 टक्‍के मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला जात आहे. सरकारने 2015 पासून दुष्काळ अधिभार लावल्याने पेट्रोल व डिझेल इतर राज्यांच्या तुलनेत महाग आहे. पेट्रोलवर 26 टक्‍के "व्हॅट' असून 11 रुपये दुष्काळ "सेस' लावल्याने पेट्रोलचा दर 80 रुपयांवर गेला होता. यामुळे राज्य सरकार तब्बल 17 हजार 800 कोटी रुपयांची अधिकची वसुली करत आहे. डिझेलवरही दोन रुपयांचा दुष्काळ कर असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारनेही राज्यांना "व्हॅट' कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पेट्रोल दोन रुपयांनी आणि डिझेल एक रुपयाने स्वस्त होईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी "ट्‌विट'च्या माध्यमातून दिली आहे. 

केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 2014च्या सुरवातीला प्रतिबॅरल 100 डॉलरपेक्षा अधिक होते. त्या वेळी पेट्रोलचे दर 80 रुपयांपर्यंत पोचले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती प्रतिबॅरल 50 डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत. तरीही पेट्रोलची किंमत 80 रुपयांच्या घरातच आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. 

पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांची यावर स्वाक्षरी झाल्यानंतर उद्यापासून (मंगळवार) हा निर्णय अमलात येईल. या निर्णयामुळे राज्याच्या उत्पन्नात दोन हजार कोटी रुपयांची घट होईल. केंद्राने उत्पादन शुल्क कमी केल्यानेही राज्याला 1500 कोटी कमी मिळणार आहे. म्हणजे एकूणात 3500 कोटी रुपये राज्याला कमी मिळतील. 
- सुधीर मुनगंटीवर, अर्थमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra news Petrol is cheaper by two rupees