कोकण, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पुणे - कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्‍यता असून, विदर्भातील काही भागांत तर, मराठवाड्यातील तुरळक भागांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तविला आहे. पुण्यातही पुढील तीन दिवस पावसाच्या काही सरी पडतील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

पुणे - कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्‍यता असून, विदर्भातील काही भागांत तर, मराठवाड्यातील तुरळक भागांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तविला आहे. पुण्यातही पुढील तीन दिवस पावसाच्या काही सरी पडतील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगरच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. मराठवाड्यातील फुलंब्री, औरंगाबाद, कन्नड येथे हलक्‍या सरी पडल्या. विदर्भातील गोंदिया, सावनेर, आरमोरी, दारव्हा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. येत्या गुरुवारपर्यंत (ता.27) कोकणातील बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाडा व विदर्भात हलक्‍या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

पश्‍चिम मध्य महाराष्ट्रातील लोणावळा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथे मुसळधार पाऊस पडला. साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील चंदगड, राधानगरी, सांगलीतील काही भाग, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, हरसूल, नगरमधील अकोले, कोपरगाव येथे हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा, कृष्णा, कोयना या नद्या भरून वाहत आहेत. तसेच पुण्यातील मुठा, नगरमधील मुळा नदीही भरून वाहत आहे. सध्या पुण्यातील येडगाव, कळमोडी, आंध्रा, खडकवासला धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर नऊ धरणांतून पाण्याच विसर्ग सुरू आहे. नाशिकमधील नांदूरमध्यमेश्वर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदावरी, दारव्हा नदी दुथडी भरून वाहत असून, नाशिकमध्ये नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित डिंभे, पानशेत, वरसगाव, पवना, चासकमान, भामा आसखेड, उरमोडी, वारणा, राधानगरी, कोयना, दारणा, गंगापूर, ऊर्ध्व वैतरणा, भंडारदरा, मुळा धरणेही भरत आली आहेत. 

पूर्व राजस्थान येथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच, ईशान्य भारतात गंगटोक येथेही दुसरे कमी दाबाचे क्षेत्र आहे. कमी दाबाचा पट्टा राजस्थान येथील जैसलमेरपासून गया, हल्दिया येथून बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. त्यामुळे राजस्थान येथे मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या काही सरी पडतील, असा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे. 

Web Title: maharashtra news rain