राज्यभर संततधार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - अर्धा पावसाळा झाल्यानंतरही निम्मा कोरडा राहिलेल्या महाराष्ट्रात रविवारपासून पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मराठवाड्याबरोबरच यंदा पावसाने ओढ दिलेल्या विदर्भालाही दिलासा मिळाला आहे. कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाने जोर धरल्याचे चित्र दिसत आहे. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रात जोरदार, तर मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेतर्फे देण्यात आला आहे. 

यंदा राज्यात तुरळक भागातच श्रावणधारांनी सुरवातीला हजेरी लावली नाही. कोकण, घाटमाथावगळता इतर ठिकाणी श्रावण कोरडा गेला. त्यामुळे अर्धा पावसाळा संपल्यानंतरही निम्मे राज्य कोरडे असल्याचे चित्र दिसत होते. पावसासाठी आवश्‍यक असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावल्याने गेला महिनाभर उत्तर आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडत होता. त्याच वेळी महाराष्ट्रावर जास्त दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्यामुळे कोकण आणि घाटमाथा वगळता इतर राज्यात सर्व ठिकाणी पावसाने दीर्घ विश्रांती घेतली होती. गेल्या चोवीस तासांपासून राज्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी भागात दमदार पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

मराठवाड्यात दमदार हजेरी 
लातूर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून पावसाच्या हलक्‍या सरींना सुरवात झाली. मध्यरात्रीनंतर औसा, उदगीर, रेणापूर, जळकोट या भागांत पावसाचा जोर वाढला. मराठवाड्यातील लातूरसह उस्मानाबाद, नांदेड, बीड येथे शनिवारपासून पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेडमध्ये रस्त्यांवरून पाणी वाहू लागले होते, तर नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढली होती. 

पश्‍चिम महाराष्ट्रात संततधार 
पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात शनिवारपासून पावसाचा जोर वाढत होता. मध्यरात्रीनंतर संततधार पाऊस सुरू झाला. रविवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दिवसभर संततधार पाऊस पडत असल्याने धरणांमधील पाण्याची पातळी पुन्हा वाढू लागली. कोयनानगर आणि महाबळेश्‍वर येथे पुन्हा दमदार पावसाला सुरवात झाली आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली भागांतही पावसाने हजेरी लावली आहे. 

बंगालच्या उपसागरात वायव्य भागात ओरिसाच्या किनारपट्टीजवळ हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागून असलेल्या समुद्रसपाटीपासून चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने हा पाऊस पडत असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. 

Web Title: maharashtra news rain