राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - हवेचा दाब कमी झाल्याने राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. शुक्रवारी सकाळपर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे - हवेचा दाब कमी झाल्याने राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. शुक्रवारी सकाळपर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

येत्या मंगळवार (ता.१९) पर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता. १६) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचे संकेत आहेत. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

शुक्रवारी (ता. १५) दिवसभर कोकणातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील बारामती, साताऱ्यातील महाबळेश्वर, नाशिकमधील इगतपुरी भागात हलका पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. मराठवाडा व विदर्भातही अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गुरुवारी (ता.१४) सायंकाळी कोकणातील श्रीवर्धन येथे १४०, हर्णे येथे ८० मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्यम महाराष्ट्रातील फलडण, लोणावळा येथे अतिवृष्टी झाली. तर उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

मराठवाड्यातील जळकोट येथे ९० मिलिमीटर पाऊस पडला. तर भूमी, चाकूर, मुखेड, सिल्लोड, तुळजापूर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर उस्मानाबाद, परंडा, पाटोदा, रेणापूर, आष्टी, औढा नागनाथ, भोकरदन अशा अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. विदर्भातील आर्वी येथे अतिवृष्टी झाली. तर पांढरकवडा, बुलडाणा, घाटंजी अशा अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. 

धरणांमध्ये ६८.१९ टक्के पाणीसाठा 
मॉन्सूनचे पुनरागमन झाले असून, त्यामुळे मराठवाडा, पुणे आणि कोकण विभागातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे अमरावती आणि नागपूर विभागातील धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये ६८.१९ टक्के पाणीसाठा जमा झाला असून, गेल्यावर्षी ६८.६० टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.

Web Title: maharashtra news rain pune