सत्तेतून बाहेर पडण्यास शिवसेना आमदार तयार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पक्षप्रमुखांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. महागाई वाढल्याने राज्यात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे सत्तेत राहायचे की नाही, यासंदर्भात सर्वांची मते जाणून घेण्यात आली. आमदारांनी त्यांची मते मांडली. आता शिवसेना निर्णयापर्यंत पोचली आहे. 
- संजय राऊत, खासदार, शिवसेना 

मुंबई - कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली वाढल्याने शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या विचारात आहे. अनेक आमदार, खासदारांनी याला पाठिंबा दिला आहे; मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अद्याप संभ्रमात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेवटची चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्‍वासन त्यांनी आपल्या आमदार, खासदारांना दिले. 

शिवसेना आमदार, खासदार आणि नेत्यांची बैठक आज "मातोश्री'वर झाली. अपेक्षित निधी मिळत नाही, सर्व निधी भाजप आमदारांकडेच वळवला जातो. मतदारसंघातील विकासकामे होत नाहीत. त्यामुळे सत्तेत राहण्यापेक्षा बाहेर पडलेले बरे, अशी खंत आमदार, खासदारांनी व्यक्त केली. तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही लोकप्रतिनिधींनी उद्धव यांना सांगितले. त्यावर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी शेवटची चर्चा करतो, असे उद्धव म्हणाले. 

भाजपबद्दल आमदार, खासदारांची नाराजी नवी नाही; मात्र राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आल्याने अशा स्थितीत राणेंसोबत सत्तेत राहणे शिवसेनेसाठी नामुष्की ठरू शकते. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्यास वरिष्ठ नेतेही अनुकूल असल्याचे समजते. 

आमदार फुटण्याच्या भीतीमुळेच शिवसेना नाइलाजाने भाजपसोबत सत्तेत राहिली आहे. सत्तेतून बाहेर पडल्यास आमदार फुटण्याची शक्‍यता आहे. आजच्या बैठकीतही काही आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्यास अप्रत्यक्ष विरोध केला. मुदतपर्व निवडणूक झाल्यास ती लढण्यासाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्‍न काही आमदारांनी उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या बैठकीत सर्व आमदारांना मोबाईलबंदीचे आदेश देण्यात आले होते. शिवसेनेतील वाद माध्यमांपर्यंत बैठक सुरू असतानाच पोचल्याचे प्रकार घडले आहेत. मागील बैठकीत आमदार आणि नेत्यांमध्ये झालेले वाद तत्काळ माध्यमांपर्यंत पोचले होते. त्यामुळे उद्धव यांनीच मोबाईल बंद ठेवण्याची तंबी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महागाईचे कारण 
महागाईविरुद्ध राज्यासह देशभर संतप्त भावना आहेत. अशातच सत्तेत राहिल्यास आगामी निवडणुकांत महागाईची राजकीय किंमत चुकवावी लागू शकते. यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाली. राणे किंवा मतदारसंघातील निधीच्या मुद्द्यांवरून सत्ता सोडणे अवघड आहे. त्यामुळे महागाईचे कारण पुढे करून सत्तेतून बाहेर पडता येते का? याची चाचपणी शिवसेना करण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: maharashtra news shiv sena mla Uddhav Thackeray