शिवसेनेला चुचकारत निवडणुकीची तयारी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 जानेवारी 2018

एकीकडे शिवसेनेला चुचकारायचे आणि दुसरीकडे स्वबळावर आगामी निवडणुका लढण्याची जोरदार तयारी करायची, अशी रणनीती भारतीय जनता पक्षाने आखली आहे. या रणनीतीच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरवात झाली असून, बुथपातळीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांच्या ताकदीचा अंदाज घेतला जात आहे. पाच हजार मतांचा मनसबदार ते विधानसभा निवडणुकीतील सक्षम उमेदवार यांचा शोध घेतला जात आहे. 

केंद्रात आणि राज्यात शिवसेना हा पक्ष सध्या भाजपबरोबर सत्तेत असला तरी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली आहे. ही घोषणा भाजपने गांभीर्याने घेतली आहे; मात्र तसे न दाखवता तळागाळातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना हा पक्ष स्वबळावर पुढील निवडणुका लढणार याची जाणीव झाल्यामुळे भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांना कामास लागण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भाजप कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी, संघाचे कार्यकर्ते कामास लागले असून, त्यांच्या गुप्त बैठकांना जोर आला आहे. यामध्ये इतर पक्षांतील ताकदवान नेत्यांना भाजपमध्ये येण्यास भाग पाडले जात आहे. अशा नेत्यांच्या मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले जात आहे. तसेच, आर्थिक रसद पुरवण्याची खात्री करून दिली जात आहे. यासाठी कोटीकोटींच्या आकड्यांची बोलाचाली होत असल्याचे समजते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देशात एकाचवेळी घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी केल्यामुळे निवडणुका केव्हाही होऊ शकतात याची खूणगाठ बांधून संघ परिवार कामास लागला आहे. मागील साडेतीन वर्षांत मोदी लाटेचा करिष्मा ओसरला असल्याचे गुजरात विधानसभा निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. याची जाणीव भाजपच्या चाणक्‍यांना असल्याने स्वबळाची तयारी करायचीच, मात्र शिवसेनेला दुखवायचे नाही, हे धोरण भाजपने आखले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादाचे जाळे टाकून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढवताना शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादी या पक्षांना मदत करणार का, असा प्रत्यक्ष सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे सध्या तरी शिवसेनेला चुचकारायची भूमिका भाजपने घेतली असल्याचे मानले जाते.

Web Title: maharashtra news shivsena bjp politics