...आता वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख अडचणीत 

...आता वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख अडचणीत 

मुंबई - वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वतःच्याच लोकमंगल समूहातील लोकमंगल डेव्हलपर्स या संस्थेला फायदा पोचवण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. टेक्‍सटाइल्स गारमेंट युनिटसाठी संस्थेच्या मालकीची जमीन आवश्‍यक असताना आणि शासन निर्णयातही तशीच तरतूद असताना प्रशासनाचा विरोध डावलून मंत्री देशमुख यांनी हा निर्णय घेतला असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. 

सोलापूरच्या प्रेषक महिला टेक्‍सटाइल्स गारमेंट औद्योगिक उत्पादक कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेशी संबंधित हे प्रकरण आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. अर्थसहायासाठीचा प्रस्ताव सादर करताना संस्थेने सावतखेड (ता. दक्षिण सोलापूर) येथील जमीन 40 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर वार्षिक भाडे 5 हजार रुपयांवर घेतली असल्याचे सांगितले होते. 31 मार्च 2017 रोजी संस्थेला अर्थसहायाचा पहिला हप्ता म्हणून 58 लाख 40 हजार रुपये इतकी रक्कम मंजूर झाली. असे अर्थसहाय देताना प्रकल्पासाठी संस्थेकडे स्वतःची जमीन असावी किंवा 30 वर्षे भाडेपट्ट्यावर असावी, असा 1999 चा शासन निर्णय आहे. 

मार्चमध्ये अनुदान मंजूर करतेवेळी संस्थेने सोलापूर शहरात दक्षिण सदर बाजारपेठेत 929.36 चौरसमीटर इतकी जागा खरेदी केली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 22 मे 2017 रोजी संस्थेने जागाबदलाचा प्रस्ताव सादर केला. यात लोकमंगल डेव्हलपर्सची मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील एक एकर जागा दहा वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतल्याचा करार प्रस्तावासोबत जोडला. यावर प्रशासनाने हरकत घेतली. त्यानंतर संस्थेने लोकमंगल डेव्हलपर्सची बसवनगर (ता. दक्षिण सोलापूर) येथील एक एकर जागा 30 वर्षे भाडेकराराने घेतली. त्यासाठी वार्षिक दोन लाख रुपये व त्यात दर तीन वर्षांनी पंधरा टक्के वाढ असे भाडे ठरले. यावरही प्रशासनाने हरकत घेत खरेदी केलेल्या जागेची सद्यःस्थितीविषयीचा अहवाल मागवला. वस्त्रोद्योग संचालकांनी या जागेचा व्यवहार रद्द झाल्याचे आणि सध्या संस्थेकडे सावतखेड आणि बसवनगर येथील दोन जागा असल्याचे कळवले. तसेच संस्थेने प्रकल्पासाठी जागेची अंतिम निवड करून तसा ठराव देणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. त्यास अनुसरून प्रशासनाने फाइल प्रधान सचिवांकडे सादर केली. प्रधान सचिवांनी आदेशार्थ या नोटिंगसह ती फाइल वस्त्रोद्योगमंत्र्यांकडे सादर केली. त्यानंतर संस्थेच्या जमीन बदलास मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे, याचाच अर्थ संस्थेला नवीन जागेवर मंजुरी हवी आहे. सबब नवीन जागेवर प्रकल्प उभारण्यास मान्यता देत आहे, असा शेरा मारून सुभाष देशमुख यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. अशारीतीने अखेरीला लोकमंगल डेव्हलपर्सच्या बसवनगर येथील जागेवरील प्रकल्प प्रस्तावाला मान्यता मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com