पाणी वाटपासाठी बैठक घ्यावी - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई - मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पाणी वाटपासंदर्भात आंतरराज्यीय प्राधिकरणाची बैठक तातडीने आयोजित करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. तसेच विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेला पेंच प्रकल्प परिसरात जलसंधारणाचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा, सूक्ष्म सिंचनावर भर देण्यात यावा आणि पाणी बचतीसाठी स्थानिकांचे प्रबोधन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

मुंबई - मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पाणी वाटपासंदर्भात आंतरराज्यीय प्राधिकरणाची बैठक तातडीने आयोजित करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. तसेच विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेला पेंच प्रकल्प परिसरात जलसंधारणाचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा, सूक्ष्म सिंचनावर भर देण्यात यावा आणि पाणी बचतीसाठी स्थानिकांचे प्रबोधन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

पेंच प्रकल्पातील पाण्याच्या समस्येसंदर्भात आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर, जलसंपदा विभाग नागपूर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, ऊर्जा विभाग, नगरविकास विभागांचे अधिकारी व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर शहर व जवळपासच्या ग्रामीण भागात लागणाऱ्या पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी तसेच बाष्पीभवन टाळण्यासाठी बंदिस्त पाईप योजना आणि दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी योजनेचा अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी वेस्टर्न कोल्डफील्ड लि.चे पाणी पेंच लाभक्षेत्रात वळवावे तसेच पुनर्उद्भवित पाणी सिंचन वापरासाठी, नागपूर जिल्ह्यासाठी चार योजना तर भंडारा जिल्ह्यासाठी तीन योजना कार्यान्वित करण्यासाठी लागणाऱ्या परवानगी आणि इतर कार्यवाहीस सुरवात करावी. 

पार्श्वभूमी : 
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सन-1964 मध्ये करारनामा झाला होता. त्यानुसार पेंच प्रकल्पातील मध्य प्रदेशास 35 टीएमसी आणि महाराष्ट्राला 30 टीएमसी पाणी देण्याचे ठरले होते. आता महाराष्ट्रातील पाणी वापर 44 टीएमसीपर्यंत पोचला आहे. आतापर्यंत राज्यास मध्य प्रदेशातून न वापरलेले अतिरिक्त पाणी मिळत होते. आता पेंच नदीवर मध्य प्रदेशातील भागावर सरकारने चौराई धरण बांधले आहे. यात 421 दशलक्षघनमीटर पाणीसाठी होणार आहे. या धरणाचे पाणी मध्य प्रदेश सरकारचे असल्याने त्याचा वापर पूर्णत: सरकारच करणार आहे त्यामुळे भविष्यात पेंच प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी कमी होणार आहे. यासाठी त्वरित करता येण्यासारख्या उपाययोजना व दीर्घकालीन उपाययोजना यांची आज सविस्तर चर्चा करण्यात आली. यात कन्हान नदीवरील उपसा सिंचन करून पेंच प्रकल्पातील उजव्या कालव्यात पाणी घेणे, तसेच मध्य प्रदेशातील प्रस्तावित जामघाट प्रकल्प आणि राज्यातील कन्हान वळण योजना यावरही चर्चा झाली.

Web Title: maharashtra news water devendra fadnavis