यशाचा मार्ग मार्गदर्शनातूनच!

के. सी. कारकर
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

या गोष्टी विसरू नका

आज एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर ते निश्‍चितपणे चांगले यश मिळवू शकतात. 

आत्मविश्वास

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धेत आपण उतरतो, तेव्हा स्वतःच्या क्षमतांबद्दल तुम्हाला पूर्ण आत्मविश्‍वास असायला हवा; मात्र हा आत्मविश्‍वास येण्यासाठी प्रथम तुम्हाला तुमची क्षमता (Strength) माहिती असायला हवी आणि त्यावर तुमचा पूर्ण विश्‍वास असायला हवा. म्हणजेच, ठरविलेले ध्येय तुम्ही सहज साध्य करू शकता. तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या विद्यार्थीदशेतील एक आठवण आहे. परीक्षा दिली, निकालाचा दिवस होता. देशमुखांच्या आईला खात्री होती की ते प्रथम येणार, त्यांनी आईला विचारले, की मी जाऊन निकाल पाहतो. तेव्हा आई म्हणाली, ‘‘तुला आत्मविश्‍वास नाही काय?’’ त्यावर सी. डी. देशमुख जे बोलले ते महत्त्वाचे होते, ते म्हणाले, ‘‘अगं, मी दुसरा क्रमांक कोणाचा आला आहे हे पाहायला चाललोय.’’ थोडक्‍यात असा आत्मविश्‍वास आपल्यामध्ये असायला हवा.

स्वयंधारणा

विद्यार्थी पदवीच्या वर्षाला असतानाच स्पर्धा परीक्षेची माहिती आपण गोळा करतो; मात्र विद्यार्थी ग्रामीण भागातील असेल, तर तो सुरवातीलाच लाखो विद्यार्थ्यांमध्ये आपण कुठे असणार, असा प्रश्न स्वतःला विचारतो. मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांसमोर उगीचच एक न्यूनगंड उभा राहतो. रंग, उंची, देखणे व्यक्तिमत्त्व अशा बाबींवरून उगीचच चुकीची गृहिते मांडली जातात. ही आपल्यातील नकारात्मक धारणा अगोदर काढून टाकावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पहिले, तेव्हा त्यांनी दिल्लीच्या बादशहा औरंगजेबाकडे लाखोंचे सैन्य, मोठे साम्राज्य असल्याने आपला कसा टिकाव लागणार याचा कधीही विचार केला नाही. त्यांनी सकारात्मक धारणा जोपासून ध्येय गाठले. केवळ स्वतःच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकतो, ही धारणा पक्की होती. म्हणूनच महाराजांना ते शक्‍य झाले.

Sakal Shiveri Foundation MPSC Exam Test Series

इच्छाशक्ती

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असण्याची गरज असते. कारण एका प्रयत्नामध्ये यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार थोडी असते. तसेच एका वेळेला लाखो विद्यार्थी आपल्याशी स्पर्धा करत असतात. दुबळी इच्छाशक्ती असणारी मने कायम कारणे देण्याच्या शोधात असतात व अशा स्पर्धेपासून ते पळ काढतात; मात्र प्रचंड इच्छाशक्ती असणारी माणसे आपल्या मनाला आपली उत्तुंग ध्येय साध्य करण्यासाठी प्रज्वलित ठेवत असतात. थॉमस अल्वा एडिसन यांनी इलेक्‍ट्रिक बल्बचा शोध लावण्यापूर्वी प्रथम त्यांनी एक हजारवेळा प्रयोग केले होते. ते अशा तारेच्या शोधात होते, की जी विद्युत प्रवाह धारण करू शकते व प्रकाशही देऊ शकते. अथक प्रयत्नांनंतर त्यांना यश प्राप्त झाले. कारण ध्येयप्राप्तीची त्यांची इच्छाशक्ती प्रचंड होती.

सातत्य

स्पर्धा परीक्षेचा कालावधी दीर्घ असतो. तीन टप्प्यांमधील पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये आपण योग्य मार्गदर्शन घेतले, योग्य व पुरेशा पुस्तकांचे वाचन केले व परीक्षेमध्ये योग्य पद्धतीने लेखन केले, तर आपल्याला प्रथम प्रयत्नामध्येही यश मिळू शकते. 

यश 

यश सर्वांनाच हवे असते; मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेली मेहनत, प्रयत्न झोकून देणे हे किती लोक करतात? तुमच्यामध्ये असलेले सर्वस्व ओतल्याशिवाय सर्वोत्तम यश मिळणार नाही. परीक्षेमध्ये यश मिळविणे ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक प्रेरणा असते. जेवढे स्वप्न मोठे, तेवढी प्रेरणा मोठी, ताकद मोठी. काहीतरी वेड डोक्‍यात घेतलेली माणसेच आयुष्यात अवाढव्य करू शकतात. अशी वेडी माणसेच शेवटी शहाणी ठरतात, यशस्वी होतात, हेच इतिहास सांगतो. अमेरिकेतल्या प्रत्येक कुटुंबात एक तरी मोटार असेल, हे स्वप्न हेन्री फोर्डने बोलून दाखविल्यावर त्यांना वेडे ठरविले गेले होते; मात्र आज परिस्थिती काय आहे? म्हणून विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावर, परीक्षेवर आपले लक्ष केंद्रित केल्यास स्पर्धा परीक्षेचे यश निश्‍चित मिळणे सहज शक्‍य आहे.

Sakal Shiveri Foundation MPSC Exam Test Series

लॅपटॉप व मोबाईलवर उपलब्ध!

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे तंत्र मोबाईलसाठी आणि संगणक किंवा लॅपटॉप अशा दोन साधनांसाठी वापरता येऊ शकेल. अँड्रॉइड मोबाईल असलेल्या उमेदवारांना मायक्रो मेमरी कार्डच्या स्वरूपात ते उपलब्ध आहे. अर्थात एका मोबाईल फोनलाच त्याचे रजिस्ट्रेशन करता येईल. लॅपटॉप किंवा संगणकासाठी मात्र ते यूएसबी पेन ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध आहे.

तंत्राची झलक यू-ट्यूबवरही 

‘यू-ट्यूब’वर ‘शिवनेरी अकॅडमी नावाचे चॅनेल आहे. ‘शिवनेरी अकॅडमी’ (shivneri academy) असे सर्च केल्यानंतर या अभ्यासक्रमांचे व्हिडिओ लेक्‍चर्स पाहायला मिळतील. संबंधित स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्‍चर्स यावर असून, डिजिटल तंत्र घेणाऱ्या उमेदवारांना चालू घडामोडींसाठी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या व्हॉट्‌सॲप अथवा ई-मेलवर प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन केले जाईल.

माझे प्रयत्न; माझे यश

आव्हानांवर मात करत स्वप्नपूर्ती : राहूल पाटील

प्रत्येक व्यक्तीला वाटते, की आपण एका उच्चपदावर नोकरी करावी. त्या दृष्टीने ती व्यक्ती अथक परिश्रम घेत असते. अपेक्षित यश मिळविण्यासाठी प्रत्येकाला संकटांचा सामना करावाच लागतो. अशीच प्रयत्नांची पराकाष्ठा करत शहरात ‘विक्रीकर निरीक्षक’पदी कार्यरत राहुल राजधर पाटील-सोनवणे राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर संबंधित पदावर रुजू होण्याचा आनंद असतानाच नशिबाने त्यांना पुन्हा आयुष्याची परीक्षा देण्यासही भाग पाडले; मात्र या स्थितीतही त्यांना आईने स्वतःची किडनी देऊन जीवनदान दिले. त्यामुळेच आज ते आपली स्वप्नपूर्ती यशस्वीपणे साकारत आहेत.

मूळ जवखेडा (ता. एरंडोल) येथील रहिवासी असलेले राहुल पाटील-सोनवणे यांनी राज्यसेवा परीक्षेत यश मिळविले असून, त्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानंतर पाटील यांनी अथक परिश्रमातून बीएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वडिलांना हातभार लावण्यासाठी त्यांनी शिकवणी घेणे सुरू केले. यातच त्यांच्यात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी म्हणजेच २०१०मध्ये राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करणे सुरू केले. यात दोन वेळा ‘एसटीआय’ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले; मात्र मुख्य परीक्षेत अपयशी ठरले. या वेळी खचून न जाता त्यांनी २०१३मध्ये नव्याने ‘पीएसआय’ची परीक्षा दिली व ती उत्तीर्ण झाले; मात्र या वेळी त्यांनी या ठिकाणी रुजू न होता काही दिवसांची मुदत मागितली. दरम्यानच्या काळात पाटील यांनी पुन्हा अभ्यास केला. अखेर २०१३मध्ये त्यांनी ‘एसटीआय’ची (सेल्स टॅक्‍स इन्स्पेक्‍टर) पूर्व व मुख्य अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या.

त्यांनी दिवस-रात्र विविध प्रकारची पुस्तके वाचून हे यश मिळविले. परीक्षा पास होऊन आता नोकरीत रुजू होणार, हा आनंद चेहऱ्यावर असतानाच त्यांच्यावर एक नवे संकट ओढवले. अचानक त्यांना त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असल्याची माहिती मिळाली. या वेळी खचून न जाता परिवाराने त्यांना साथ दिली व मुलाला वाचविण्यासाठी त्यांच्या आई शोभा पाटील यांनी त्यांना स्वतःची किडनी देत जीवनदान दिले. 

नव्या आयुष्याची सुरवात

आईने किडनी दिल्यानंतर राहुल यांनी नव्या आयुष्याची सुरवात केली. ते २०१४ मध्ये ‘विक्रीकर निरीक्षक’पदी जळगावात रुजू झाले. आज ते उच्च पदावर नोकरीस असले, तरी त्यांनी आपला अभ्यास सोडलेला नाही. नियमित अभ्यास करून ते आणखी उच्च पदावर नोकरी करण्यासाठी तितक्‍याच जिद्दीने तयार आहेत.

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Web Title: maharashtra news way of guidance only through guidance