‘कन्यारत्नां’नीच उजळताहेत घरे! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

  ‘कारा’ची नियमावली
 सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटीच्या (कारा) नियमावलीनुसार मूल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना मुलगा की मुलगी दत्तक घ्यायची, हा निवडीचा पर्याय उपलब्ध आहे. भारतीयांप्रमाणे अनिवासी भारतीय आणि परदेशी नागरिकही देशातील मूल दत्तक घेऊ शकतात.

‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ असा समज समाजातील समज मोडीत निघत आहे. त्यामुळे दत्तक घेणाऱ्यांमध्ये मुलीचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातून नोंदविण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये मुली दत्तक घेण्याचे प्रमाण मुलांपेक्षा दुप्पट झाले आहे. मुलापेक्षा आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी ‘कन्यारत्न’ आल्यास आपले घरच सर्वांगाने उजाळून निघेल, या भावनेने मुलगी दत्तक घेण्याकडे अनेक दांपत्याचा कल वाढला आहे. केवळ दांपत्याचे नव्हे, तर ‘सिंगल मदर’देखील ‘एकीला दोघी जोडी’ या भावनेतून मुलगी दत्तक घेत आहेत. एकामागोमाग एक मुली होत आहेत, परंतु पदरी मुलगा पडत नाही, मग ‘वंशाला दिवा हवा’ म्हणून मुलगा दत्तक घेण्याचा पर्याय पालक काही वर्षांपूर्वी स्वीकारायचे. परंतु आता ही मानसिकता बदलल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नाला पाच ते दहा वर्षे होऊनही अपत्य न झाल्यास ‘मूल’ दत्तक घेण्याचा पर्याय निवडला जायचा. आजही हा पर्याय निवडला जात असला, तरी मुलगी दत्तक घेण्याला अधिक पसंती दिली जात आहे.

हल्ली काही जण ठरवूनच मुली दत्तक घेत आहेत. लग्न करण्यापूर्वीच ‘आपण मुलगी दत्तक घेऊयात,’ अशीही बोलणी होत आहेत. सुवर्णा संतोष सुतार यांच्या जीवनात ‘आनंदी’च्या रूपाने एक कळी उमलली. दोन महिन्यांची असताना लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आनंदी आता सात वर्षांची झाली आहे. याबद्दल सुवर्णा म्हणतात, ‘‘आम्हाला सुरवातीपासून मुलगी हवी होती. तिच्या रूपाने मला आयुष्यातील नानाविध रंगछटा पाहायला मिळत आहेत. तिनेच आमचे आयुष्य फुलविले आहे. तिच्यामुळे घरात आनंद आल्याने आम्ही तिला ‘आनंदी’ म्हणतो. परंतु ‘श्राग्वी’ हे तिचे खरे नाव आहे.’’

गेल्या दहा वर्षांत मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘सिंगल मदर’ यादेखील मुलगी दत्तक घेण्यास प्राधान्य देतात. तसेच एक मुलगी असतानाही काही पालक दुसरी मुलगी दत्तक घेत आहेत. आपले मूल-मुली स्वत:च्या पायावर उभे राहिल्यानंतर काही पालक ‘आम्हाला एका मुलीचे किंवा त्यापेक्षा जास्त मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारायचे आहे’ अशी इच्छा ‘सोफोश’मध्ये संपर्क साधून व्यक्त करत आहेत. तसेच अनेक जण ८ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींचे शैक्षणिक पालकत्वही घेत आहेत. मुलींना दत्तक घेण्यास इच्छुक असणाऱ्या पालकांची प्रतीक्षा यादीदेखील तुलनेने अधिक आहे. 
- शर्मिला सय्यद, प्रशासकीय अधिकारी, सोफोश

इच्छुक पालकांच्या वयाची (आई आणि वडील) बेरीज ९०, १०० आणि ११० असल्यास अनुक्रमे ० ते ४, ४ ते ८ आणि ८ ते १८ वर्षांपर्यंतचे मूल दत्तक घेता येते.

असे वाढले मुलगी दत्तक घेण्याचे प्रमाण 
वर्ष                               बालक         बालिका     एकूण
२०१२-२०१३                ३०              ४४            ७४
२०१३-२०१४                ४३              ४६            ८९
२०१४-२०१५                ४९              ४७            ९६
२०१५-२०१६                ३४              ४४            ७८
२०१६-२०१७                २३              ४१            ६५ 

Web Title: maharashtra news World girl day baby