सख्ख्या आईला सोडलं तर फडणवीसांना काय साथ देणार; संजय राऊतांचा शिंदेंवर थेट हल्ला

Eknath Shinde vs Sanjay Raut
Eknath Shinde vs Sanjay Rautesakal
Summary

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय.

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय. आज या सत्तासंघर्षाचा सहावा दिवस आहे. दरम्यान, सेनेच्या सामना वृत्तपत्रातून बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलीय. शिवाय, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील बंडखोरांवर ट्विटव्दारे निशाणा साधलाय.

राऊतांनी 'रोखठोक'मधून म्हटलंय, एकनाथ शिंदे व चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटन ठाम असते. श्री. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रीपद कोणी रोखले? असा सवाल करण्यात आलाय. शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ते आधी सुरतला जाऊन राहिले. नंतर गुवाहाटीला पोहोचले. या सगळ्यांचे नेतृत्व श्री. शिंदे करीत असले तरी या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत, हे श्री. शिंदे यांनीच उघड केले. भाजपची महाशक्ती आपल्या पाठीशी आहे, अशी कबुलीच त्यांनी दिली. सुरतमधील ‘मेरिडियन’ हॉटेलात शिवसेनेच्या आमदारांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा ‘फुटीर’ आमदारांच्या सरबराईसाठी वापरण्यात आली. सुरतवरून हे बिऱ्हाड खास विमानानं आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आले. आसामच्या भाजप सरकारने या बिऱ्हाडाची सर्व व्यवस्था केली. या सर्व प्रकरणाशी जर भाजपचा संबंध नव्हता, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला होता, तर मग या बिऱ्हाडाची इतकी कडेकोट व्यवस्था करण्याचे कारण काय? असा सवालही उपस्थित करण्यात आलाय.

दुसरं महत्त्वाचं, बिऱ्हाड गुवाहाटीत पोहोचल्यावर काही आमदार मुंबईतून निघाले ते थेट गुवाहाटीला न जाता आधी सुरतला गेले. तिथून गुवाहाटीला गेले. ते रहस्य काय? सुरतच्या भूमीवर असा कोणता मंत्र या आमदारांना देण्यात आला? जे आमदार नंतर गुवाहाटीला गेले, त्यांनाही ‘व्हाया’ सुरत जावे लागले. हा संशोधनाचा विषय आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध उघड बंड केले व त्यांना शिवसेनेच्या चाळीस आमदारांचे समर्थन मिळाले. नारायण राणे व छगन भुजबळ यांनाही त्यांच्या बंडात आमदारांचे इतके समर्थन मिळाले नव्हते. छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला तेव्हा शिवसेना सत्तेवर नव्हती, पण ग्रामीण भागात शिवसेना फोफावत होती. भुजबळांचे बंड हे मनोहर जोशींविरुद्ध होते व भुजबळांना मोठ्या प्रमाणात लोकांची सहानुभूती असूनही स्वतः भुजबळ माझगाव विधानसभेत निवडणूक हरले व त्यांच्याबरोबर गेलेल्या बहुतेक सर्व आमदारांचा निवडणुकीत पराभव झाला. अनेकांची राजकीय कारकीर्दच संपली. याचीही आठवण सामनामधून करुन देण्यात आली आहे.

Eknath Shinde vs Sanjay Raut
महाराष्ट्राच्या राजकारणात कर्नाटकची एन्ट्री; काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

नारायण राणे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्या सोबतही दहाच्या वर आमदार नव्हते. राणे यांचे कोकणात त्यावेळी महत्त्वाचे स्थान होते. राणे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात पोटनिवडणुका झाल्या. त्यात काही लोक जिंकले, पण नंतरच्या मध्यावधी निवडणुकीत श्री. राणे यांच्यासह त्यांच्या बरोबर गेलेले बहुतेक सर्वच आमदार कोकणात पराभूत झाले व त्यांची कारकीर्दच कायमची संपली. शिवसेनेतून जे बाहेर पडले, त्यांना राजकारणात उभे राहणे कठीण झाले. त्यामुळे आज जे चाळीस आमदार सुरत, गुवाहाटी, गोवा असे पर्यटन करीत आहेत, त्यांचे राजकीय भवितव्यच पणाला लागले. बंडात सहभागी झालेला मराठवाड्यातला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही हे पहिले व त्याआधीच त्यांच्या आमदारकीवर अपात्रतेची तलवार पडू शकेल असे कायदा सांगतो हे दुसरे. विधिमंडळ पक्षात फूट पडली. म्हणून स्वतंत्र गट स्थापन करून राजकारण करता येणार नाही. विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणजे मूळ पक्ष फुटला असे नाही. पक्षात फूट पडणे व विधिमंडळात फूट पडणे या दोन भिन्न बाबी आहेत. शिवसेना हा पक्ष एकसंध आहे हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले.

नक्की काय घडलं?

शिंदे हे शिवसेनेतील अलीकडच्या काळातील महत्त्वाचे नेते होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने श्री. शिंदे यांना फडणवीस काळात व ठाकरे सरकारात महत्त्वाची खाती दिली. नगरविकास खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. उद्धव ठाकरे यांनी ते शिंदेंकडे सोपवले. या खात्याचा पसारा व आर्थिक उलाढाल मोठी आहे. मुख्यमंत्री करण्याबाबत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा शब्द होता असे सांगितले जाते. त्यातून हे बंड झाले. मुख्यमंत्री पदाबाबत शब्द असू शकतो, पण भारतीय जनता पक्षाबरोबर झालेला ‘अडीच वर्षे’ मुख्यमंत्रीपदाचा करार भाजपने मोडला. हा करार पार पडला असता तर श्री. शिंदेच मुख्यमंत्री झाले असते हे नक्कीच. उद्धव ठाकरे यांनी त्यांचेच नाव पुढे केले असते. शिंदे यांचा घात भाजपने केला. त्याच भाजपबरोबर श्री. शिंदे व त्यांच्या बरोबरच्या आमदारांना आता जायचे आहे. हे आश्चर्य आहे. श्री. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले ते नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीची गरज म्हणून. स्वतः शरद पवार व सोनिया गांधी यांनी त्यांना आग्रह केला व मुख्यमंत्रीपदी बसवले, पण शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हुकले ते फक्त भाजपनं शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटत आहे, अशी टीकाही सामनामधून करण्यात आली आहे.

Eknath Shinde vs Sanjay Raut
PHOTO : एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील घराला कडेकोट पोलीस बंदोबस्त

अब्दुल सत्तारांचं कोणतं हिंदुत्व महाविकास आघाडीमुळं धोक्यात आलं?

शिवसेनेतून आज जे आमदार बाहेर पडले, त्यातले काही आमदार मूळ शिवसेनेचे नाहीत. अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व महाविकास आघाडीमुळे धोक्यात आले? दीपक केसरकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करीत शिवसेनेत आले व मंत्रीही झाले. त्यांनी भाजप व हिंदुत्वाच्या गप्पा मारत सुरतमार्गे गुवाहाटी गाठावी हे गमतीचे आहे. तानाजी सावंत, सुहास कांदे हे फिरस्ते आहेत. ‘चाय तिकडला न्याय’ हे त्यांचे धोरण. असे अनेक जण आहेत. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, लता सोनवणे या आमदारांवर ईडी व जात पडताळणीसंदर्भात तलवारी लटकल्या होत्या. गुवाहाटीस जाण्यापूर्वी तूर्तास त्यांना अभय देण्यात आले. आता श्री. किरीट सोमय्या काय करणार? ‘‘माझ्या ईडीच्या सर्व केसेस क्लीअर झाल्या. मी सुटलो. त्यामुळे मी भाजप सांगेल ते करतोय,’’ असे सांगून ठाण्याचे एक आमदार सुरतला गेले. पाठोपाठ यामिनी जाधव, लता सोनवणे पोहोचल्या. गुलाबराव पाटील हे स्वतःस शिवसेनेचा वाघ वगैरे म्हणवून घेतात. पान टपरीवरल्या सामान्य शिवसैनिकास शिवसेनेने आमदार व कॅबिनेट मंत्री कसे केले याची वीरश्रीयुक्त कथने जाहीर सभांतून करतात, पण तेच गुलाबराव पाटील यांना कोणीतरी ईडी कारवाईची पोकळ धमकी देताच ते पळून गेले. संदीपान भुमरे यांना मोरेश्वर सावे यांची उमेदवारी कापून तेव्हा पैठणची उमेदवारी दिली. शिवसैनिकांच्या मेहनतीने ते सतत विजयी झाले. आज ठाकरे सरकारात ते कॅबिनेट मंत्री झाले. पैठणच्या एका साखर कारखान्याच्या दारात वॉचमनची नोकरी करणारा हा माणूस शिवसेनेमुळे 30 वर्षे सत्तेत आहे व वेळ येताच पळून गेला. दादा भुसेंपासून अनेक आमदार जे फक्त शिवसेनेमुळे आमदार व मंत्री झाले, ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा भाजपचा जाच होता व आज महाविकास आघाडीत आहेत तेव्हा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्रास होतोय.

बंडखोरीचा इतिहास तेच सांगतो

भारतीय लोकशाहीचे घाणेरडे चित्र आधी मध्य प्रदेशात दिसले व आता महाराष्ट्रात दिसत आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या बावीस आमदारांनी राजीनामा दिला व ते निवडणुकांना सामोरे गेले. महाराष्ट्रात शिवसेनेने दिलेल्या आमदारकीसह लोक पळून गेले. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा लोकांचा कौल घेतला पाहिजे. आमदारांना या राज्यातून त्या राज्यात व या हॉटेलातून त्या हॉटेलात पळवत ठेवणे ही कसली लोकशाही? 40 आमदार व त्यांच्या नेत्यांना मुंबईत थांबूनही त्यांची भूमिका मांडता आली असती व महाराष्ट्रातील अनेकांना ज्या प्रकारे केंद्राने सुरक्षा पुरवली, तशी सुरक्षा या आमदारांना भाजपने पुरवलीच असती, पण आमदारांना पळवले जात आहे. चार्टर्ड विमाने, गाड्या, हॉटेल्स यावर अमर्याद खर्च लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली सुरू आहे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, शिवसेना सोडून छगन भुजबळ व नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. श्री. एकनाथ शिंदे तरी होतील काय? शिवसेनेत राहूनच ते मुख्यमंत्री होण्याची खात्री जास्त होती. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्या बरोबर आहे. या आकड्यांत पैशाला चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ‘ईडी’च्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या श्री. शिंदे यांना सोडूनही पळ काढतील. बंडखोरीचा इतिहास तेच सांगतो.

त्यांनी आईला सोडलं, तिथं फडणवीसांना काय साथ देणार?

महाराष्ट्रात आजही ठाकरे कुटुंबाविषयी कमालीची आस्था व कृतज्ञता आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी श्रद्धा आहे. बाळासाहेबांचा आत्मा ज्यांनी दुखावला त्यांचे राजकीय श्राद्धच महाराष्ट्रात घातले गेले. 22 जूनला संध्याकाळी श्री. उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून एक भावनाविवश भाषण केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरांत अश्रुधारा वाहिल्या. सांजवेळी श्री. ठाकरे व त्यांच्या कुटुंबाने ‘वर्षा’ बंगल्यातून सामान आवरून ‘मातोश्री’कडे प्रस्थान केले तेव्हा रस्त्यात ठाकरेंच्या मानवंदनेसाठी दुतर्फा गर्दी होती. सांजवेळी बाळासाहेबांच्या मुलास घर सोडावे लागले याचा प्रचंड संताप लोकांत, खासकरून महिलावर्गात होता. त्या एका घटनेने महाराष्ट्र हेलावला. अश्रूंत मोठी ताकद असते हे येणारा काळच सिद्ध करील! या सर्व घडामोडींचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेतील फुटिरांना प्रोत्साहन देऊन फडणवीस सरकार बनवणार असतील तर ते सरकार टिकणार नाही. या सर्व आमदारांची भूक मोठी आहे. त्यांनी आईला सोडले तेथे फडणवीसांना काय साथ देणार? असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय.

'आना ही पडेगा, चौपाटी में'; झिरवाळांचा भन्नाट फोटो टाकत राऊतांचं खोचक ट्वीट

आज या सत्तासंघर्षाचा सहावा दिवस आहे. या दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत मात्र सकाळी उठल्याबरोबर एखादं ट्वीट करत आपल्या विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत. आज देखील संजय राऊत यांनी सकाळी सकाळी एक भन्नाट ट्वीट केलं आहे. 'कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. असं म्हणत त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो टाकत ट्वीट केलंय. नरहरी झिरवाळ यांचा कमरेवर हात ठेवलेला हा भन्नाट फोटो त्यांनी पोस्ट केलाय. कधीपर्यंत गुवाहाटीत लपून बसणार आहात, चौपाटीवर म्हणजे मुंबईला यावंच लागेल, असा इशाराच या माध्यमातून संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com