esakal | ऑगस्टमध्ये चांगल्या पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

rain

गेल्या 24 तासात राज्यात ढगाळ वातावरणाची स्थिती असून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

ऑगस्टमध्ये चांगल्या पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे (प्रतिनिधी) - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ हवामान राहणार आहे. तर, पुढील चार ते पाच दिवस कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राजस्थानचा दक्षिण भाग ते उत्तर गुजरात या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. याशिवाय उत्तर भारतात मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, पिलानी ते मेघालयपर्यंत कायम आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरणाची स्थिती असून राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रविवारी (ता.२) सकाळी आठवाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ५४.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

हे वाचा - आंबेगाव, खेड व शिरूरवासियांनो कोरोनाबरोबर आता 'या' संकटाचा सामना करावा लागणार?

कोकणातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान असून सावंतवाडी, मालवण, दापोली, राजापूर, हर्णे, कणकवली या भागात मध्यम स्वरूपाचा तर अनेक भागात पावसाचा शिडकावा झाला. मध्य महाराष्ट्रातही घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे ४३ मिलिमीटर पाऊस पडला असून दुष्काळी असलेल्या बीडमध्ये ४० मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

येत्या मंगळवारी (ता. 4) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून त्याचबरोबर अरबी समुद्री भागामध्ये पश्चिमी वाऱ्यांच्या प्रवाहामुळे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात मंगळवार ते बुधवार (ता.5) मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामानशत्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी दिली.

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

असा असेल राज्यातील पावसाचा अंदाज
- कोकण गोवा : येत्या पाच दिवसांसाठी कोकण गोव्यातील बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता. 
- मध्य महाराष्ट्र : 3 ते 6 ऑगस्ट पर्यंत मध्य महाराष्ट्रातील 75 टक्के भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडतील. दरम्यान 4 ते 5 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा.
- विदर्भ : आतापर्यंत विदर्भात कमी पावसाची नोंद झाली असून पुढील 48 तासांमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. तर येत्या गुरुवार पर्यंत बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता.