Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला

कोकण, पश्‍चिम विदर्भ, मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यात मुसळधार
Nashik Godawari River Flood
Nashik Godawari River Floodsakal

पुणे - राज्यातील कोकण, पश्‍चिम विदर्भासह नाशिक जिल्ह्यात शनिवारी (ता. ९) जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालन्यात जोर अधिक राहिला. तर इतर जिल्ह्यांत हलका पाऊस झाला. खानदेशसह सातारा, कोल्हापूरचा पश्‍चिम भाग, यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला.

उर्वरित राज्यात अपवाद वगळता ढगाळ हवामान राहिले. या पावसामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. नगर, सोलापूर, सांगलीसह राज्याच्या अनेक भागांत अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

शुक्रवारपासून (ता. ८) जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, पावसाअभावी संकटात सापडलेल्या पिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यात पाऊस सुरू आहे.

शनिवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार बुलडाण्यातील मलकापूर तालुक्यात सरासरी ७५ मिलिमीटर पाऊस झाला. तालुकाभर अतिवृष्टी झाली आहे.

धरणगाव मंडलात विक्रमी ९८ मिलिमीटर पाऊस झाला. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सलग तिसऱ्या दिवशी ८२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या २४ तासांत परभणी जिल्ह्यात सरासरी ११ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २०.१ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांतील पावसामुळे खरीप पिकांना तरारी आली आहे. नागपूर विभागात बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहिले. यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) रात्रीपासून पावसाने हजेरी लावली.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी पश्‍चिम भाग सोडला, तर अजूनही जिल्ह्यात जोरदार पाऊस नाही. दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. अधून-मधून पावसाची संततधार पडत आहे. सांगली जिल्ह्यात कधी ढगाळ तर कधी ऊन होते. सोलापुरात कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण होते.

कोल्हापूर जिल्ह्यात पश्‍चिम भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पूर्वेकडे ढगाळ हवामान होते. एवढा झाला. सातारा महाबळेश्‍वर, पाटण, जावळी तालुक्यांत अनेक ठिकाणी मध्यम पाऊस झाला. या पावसामुळे खरिपाच्या काही प्रमाणात का होईना आशा पल्लवित झाल्या आहेत.

गोदावरीला पूर

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या जिवात जीव आला आहे. धरणातील साठ्यांतही वाढ होत आहे. जिल्ह्यातील १०६ महसूल मंडलांपैकी ४४ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यंदा गोदावरी नदीला पहिला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे.

याशिवाय गिरणा, कादवा, कोलवण, आरम, मोसम, उनंदा, वालदेवी नदीला पूर आला आहे. कोलवणच्या दोन्ही काठांच्या रहिवाशांना खबरदारीची सूचना देण्यात आली होती. सुरगाणा, दिंडोरी, कळवण, सटाणा, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, इगतपुरी, नाशिक तालुक्यांत पावसाचा जोर राहिला.

दिवसभरात...

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार

  • कोल्हापूर जिल्ह्यात पश्‍चिम भागात हलक्या सरी

  • सातारा जिल्ह्यात हलका पाऊस

  • पश्‍चिम विदर्भात जोर; मलकापूर तालुक्यात अतिवृष्टी

  • जळगाव, धुळे जिल्ह्यात चांगला पाऊस

  • नाशिकमध्ये ४४ मंडलांत अतिवृष्टी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com