esakal | Maharashtra: मृतक एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना 5 लाखांचे आर्थिक सहाय्य
sakal

बोलून बातमी शोधा

ST

मृतक एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना 5 लाखांचे आर्थिक सहाय्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या महामारीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेल्यांना 50 लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. तर, शासन निकषानुसार पात्र न ठरलेल्या मृतक कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय एसटी महामंडळ प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार गेल्या महिन्यात एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संबंधित ठराव पास करण्यात आला असून, 22 मार्च 2020 ते 30 जून 2021 पर्यंतच्या मृतक एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वारसांना आता 5 लाखांचे आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासंबंधित अधिकृत परिपत्रक काढून राज्यभरातील विभाग नियंत्रकांकडून माहिती मागितली आहे.

एसटी महामंडळाच्या सेवेत कार्यरत असताना कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावाने मृत्यूमुखी पडलेल्या सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांचा या योजनेत समावेश असणार आहे.तर महामंडळात कामकाजाकरीता नियुक्त केलेले कंत्राटी, बाहय स्तोत्राद्वारे घेतलेले, मानसेवी यांच्या वारसांचा या योजनेत समावेश नसणार आहे. त्यामध्येही एसटीचे अधिकारी, कर्मचारी इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा त्याच्या मृत्युच्या तारखेच्या दरम्यान 14 दिवसांच्या काळात किमान एक दिवस कर्तव्यावर हजर असणे अनिवार्य आहे. त्यांनतर हजेरी विभाग, घटक प्रमुख यांचेकडून प्रमाणित करण्यात येणार आहे.

हेही वाचा: कोथरुड : मयुर कॉलनी पादचारी उड्डाण पुलावर घाणीचे साम्राज्य

गेल्यावर्षी 1 जून रोजी एसटीच्या कर्मचारी वर्ग विभागाने दिलेल्या आदेशातील निकषानुसार 50 लाखाचे सानुग्रह सहाय्य योजनेअंतर्गत सहाय्य देण्यात आलेले कर्मचारी 5 लाखांच्या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. तर या योजनेसाठी एसटी कर्मचा-याचा मृत्यू कोविड- 19 मुळे झाला असल्याबाबतचे शासकीय रुग्णालय, पालिका, महानगर पालिका, आयसीएमआर किंवा नोंदणीकृत खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अहवालाच्या आधारे या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या महामारीच्या दरम्यान आतापर्यंत एसटी महामंडळात 9044 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. तर 8686 कर्मचारी बरे होऊन पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहे. त्यापैकीच 306 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, गुरुवार पर्यंत 52 कर्मचारी अद्याप कोरोनाचा उपचार घेत असल्याचे एसटी प्रशासनाने संगितले आहे.

loading image
go to top