ED कडून मोठी कारवाई! अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खाजगीरित्या विकत घेतला गेला आला.

ED कडून मोठी कारवाई! अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त

मुंबई : साताऱ्यामधील कोरेगाव परिसरातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी (Jarandeshwar Cooperative Sugar Factory) (जरंडेश्वर एसएसके) संबंधित जमीन, इमारत, प्लांट, मशीन अशा 65 कोटी 75 लाख रुपयांच्या मालमत्तेवर गुरूवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) टाच आणली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Deputy Chief Minister Ajit Pawar) मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर ही जप्तीची कारवाई करण्यात आलीय. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी सहकारी कारखाना होता. मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खाजगीरित्या विकत घेतला गेला आला. अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते. (Maharashtra State Co-operative Scam ED Attaches Sugar Mill Ajit Pawar Relative)

ही मालमत्ता सध्या गुरू कमोडिटी सर्व्हिस प्रा. लि. यांच्या नावावर आहे. ती जरंडेश्वर साखर मिल, मेसर्स स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. यांना लीजवर देण्यात आली होती. जरंडेश्वर साखर मिलमध्ये स्पार्कलिंग सॉईलचे बहुसंख्य शेअर्स आहेत. स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. ही कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ईडीने सांगितलेय. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यांच्या मालकांनी महाराष्ट्र राज्य सहकार बँकेकडून कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं. नंतर त्या साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला. या साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्याअनुषंगाने ईडीने केलेली ही मोठी कारवाई आहे.

हेही वाचा: राज्यात गृहराज्यमंत्री आहेत, हेच कुणाला माहिती नाही

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 22 ऑगस्ट, 2019 ला 120(ब), 420, 467, 468, 471 भादंविसह भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कलम 13 (1) (ब) व 13(1) (क) नुसार एमएससीबी बँक प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 26 ऑगस्ट 2019 या प्रकरणी पीएमएलएल कायद्यानुसार तपासाला सुरूवात केली. त्याअंतर्गत 2010 मध्ये एमएससीबीने या साखर कारखान्याचा कमी दरात लिलाव केला व लिलावासाठी अपेक्षित प्रक्रियाही पाळल्या गेल्या नसल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. त्यावेळी अजित पवार हे एमएससीबीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचे सदस्य होते. गुरू कमोडिटी सर्व्हिसने ती खरेदी केली. त्यानंतर ती जरंडेश्वर साखर गिरणी. प्रा. लि. ती लीजवर देण्यात आली. सध्या ती एसएसके नावाने काम करत आहे. एसएसकेच्या खरेदीसाठी आलेला मोठा निधी हा जरंडेश्वर साखर गिरणी प्रा.लि. यांच्याकडून आला. तो स्पार्कलिंग प्रा. लि. यांच्याकडून मिळाल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: माणच्या राजकारणात गोरे बंधूंचं वर्चस्‍व

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, एसएसके खरेदी करण्यासाठी गुरू कमोडिटी सर्व्हिस प्रा. लि. या बनावट कंपनीचा वापर करण्यात आला. प्रत्यक्षात साखर मिल ही जरंडेश्वर साखर मिल प्रा. लि.चे नियंत्रण आहे. याशिवया एसएसकेचा वापर 700 कोटींच्या कर्जासाठी करण्यात आला. जरंडेश्वर साखर मिल प्रा. लि. हे कर्ज 20100 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतले होते. त्यामुळे गुरू कमोडिटीशी संबंधित मालमत्तांवर ईडीने टाच आणल्याचे सांगितले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवार आणि ६५ जणांना क्लीन चिट दिली होती. मुंबईच्या सत्र न्यायालयात मागील वर्षी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र, या निकालाला माजी मंत्र्यांसह पाच जणांनी आव्हान दिलं होतं.

Maharashtra State Co-operative Scam ED Attaches Sugar Mill Ajit Pawar Relative