राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?; घोळ मिटेना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

राज्यातील पूर्वीच्या राष्ट्रपती राजवटी 
कलम 356 नुसार एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. कलम 365 नुसार एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्‍य असते. 

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी लागलेल्या विलंबामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबत चर्चा सुरू असून, उद्या (ता. 8) रात्री बारापर्यंत युतीमध्ये सहमती न झाल्यास हा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

मुनगंटीवार म्हणतात,शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री

राज्यात फक्‍त अपवादात्मक परिस्थितीतच ही प्रक्रिया सुरू होऊ शकते. असे सांगण्यात येत असले तरी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. त्यामुळे अद्याप युतीमध्ये सत्तेविषयी तोडगा निघालेला नाही. घटनेतील तरतुदीनुसार विधानसभेचा कालावधी संपला तरी नवीन विधानसभा स्थापित होईपर्यंत सध्याचे काळजीवाहू सरकार अस्तित्वात असेल, अशीही शक्यता आहे.

मला स्वतःहून युती तोडायची नाही : उद्धव ठाकरे 

राज्याची सत्ता स्थापन करताना शिवसेना आणि भाजपातील तणाव वाढला असल्याने सत्तास्थापनेबाबत आज 14 व्या दिवशीही कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. 2014 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्‍टोबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर विधिमंडळाचे पहिले अधिवेशन 10 नोव्हेंबर 2014 रोजी सुरू झाले. म्हणजेच 13 वी विधानसभा या दिवशी अस्तित्वात आली. त्यामुळे सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 पर्यंत असेल, अशी घटनेत तरतूद आहे. या तारखेनंतरही नवीन सरकार आणि 14 वी विधानसभा अस्तित्वात येऊ शकली नाही तरी लगेच राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत घटनेत कोणतीही तरतूद नाही. पण, राज्याची वाटचाल त्या दिशेनेच सुरु असल्याचे बोलले जात आहे. 

राज्यातील पूर्वीच्या राष्ट्रपती राजवटी 
कलम 356 नुसार एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. कलम 365 नुसार एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्‍य असते. 

राज्यात राष्ट्रपती राजवट दोन वेळा लावण्यात आली होती. 
1. महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले होते. बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्या वेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. 
2. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्‍टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असता दोन्ही काँग्रेसमधील वादामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे काळजीवाहू सरकार आपोआप बरखास्त झाल्याने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra state heading towards president rule