Vidhansabha 2019 : शहाच करणार युतीचा फैसला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असतानादेखील भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा रविवारी मुंबईच्या भेटीवर येणार असून, या भेटीत युतीच्या निर्णयाचा तुकडा पडणार असल्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असतानादेखील भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा रविवारी मुंबईच्या भेटीवर येणार असून, या भेटीत युतीच्या निर्णयाचा तुकडा पडणार असल्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

शिवसेना-भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सारे काही आलबेल नाही. शिवसेनेला भाजपने दिलेला प्रस्ताव मान्य होत नाही, तर भाजपला शिवसेनेने केलेली जागेची मागणी अमान्य आहे. शिवसेनेला २८८ पैकी १४४ जागा हव्या आहेत. स्वबळावरच बहुमत मिळविण्याचा आत्मविश्‍वास असलेला भाजप तितक्‍या जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने जागावाटपावर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यातच आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडला असलेला शिवसेनेचा विरोध आणि कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाष्य यामुळे शिवसेना आणि भाजपमधील दरी वाढत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहा मुंबईत येत आहेत. एका स्थानिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शहा हे मुंबईत जागावाटपाबाबत खलबते करणार असल्याचे समजते.

निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदार युतीबाबत अधिकृत निर्णय शहा घेणार असल्याचे सांगितले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जागावाटपाबाबत शहा यांच्याशी चर्चा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. तसेच या वेळी घटकपक्षांच्या जागावाटपाबाबतही चर्चा होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Amit Shah Yuti Decision Politics