Vidhansabha 2019 : मुंबई-ठाणे : युतीतच वर्चस्वाची लढाई !

Mumbai-Thane
Mumbai-Thane

विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढले तरीसुद्धा मुंबईचे कुरुक्षेत्र होणारच. मुंबईत एकूण ३६ पैकी शिवसेनेचे १४; तर भाजपचे १५ आमदार. वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणे यांचे खंदे समर्थक कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये, तर वरळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. वरळी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे आहेत. वरळीतून आदित्य ठाकरे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे खचलेपण मुंबईत अधिकच अधोरेखित होत आहे.

मुंबईत काँग्रेसचे पाच आमदार आहेत. त्या जागा कशा टिकवायच्या, हेच मोठे आव्हान असेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथे ‘राष्ट्रवादी’ला खातेही उघडता आले नाही. ‘राष्ट्रवादी’चा वरळीचा गडही शिवसेनेने काबीज केला आहे. पुन्हा नव्या जोमाने ‘राष्ट्रवादी’नेही बांधणी सुरू केली असली तरी, मुळातील त्यांचा प्रभावच तुटपुंजा.  

या पार्श्‍वभूमीवर मनसेची भूमिका महत्त्वाची ठरते. विक्रोळी, भांडुप, मुलुंड, घाटकोपर पश्‍चिम, माहीम आदी मतदारसंघांत मनसेची ताकद आहे. मनसे मुंबईत लढली, तर शिवसेनेलाच त्याचा फटका अधिक बसेल आणि वंचित बहुजन आघाडी लढल्यास त्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसण्याची शक्‍यता आहे.

युती झाल्यास ठाणे एकतर्फी
ठाणे जिल्ह्यात भाजप - शिवसेना युती टिकून राहिली तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची दमछाक होईल. युती फिसकटली तर कळवा-मुंब्रा मतदारसंघाचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी शिवसेना- भाजपमध्ये चुरशीची लढत होईल. मोदी लाटेतही जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले होते, हे विसरता येणार नाही. 

शिवसेनेकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे; तर भाजपकडे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण असे जिल्हास्तरावरील नेतृत्व कार्यरत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हास्तरावरील नेतृत्वाची वानवा आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप नाईक भाजपमध्ये गेले आहेत. पाडुरंग बरोरा यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. उल्हासनगर येथील ‘राष्ट्रवादी’च्या आमदार ज्योती कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांचे भाजपबरोबरचे सख्य वाढलेले आहे. अशा वेळी कळवा मुंब्रा येथील ‘राष्ट्रवादी’चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघाचा अपवाद वगळता आघाडीची अनेक मतदारसंघात उमेदवार निवडतानाही दमछाक होणार आहे. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाने एकेकाळचे भाजप-शिवसेना महायुतीचे प्रमुख विरोधकच संपल्याने नवी मुंबईत भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. पालघर जिल्ह्यात शिवसेनेने परस्परच वसईतील तीन जागांसह पालघरवर दावा सांगितला आहे. लोकसभेचाच दुसरा अंक येथे पहायला मिळत असून . युती आणि आघाडीत येथे एकवाक्‍यता नसल्याने संभ्रम वाढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com