Vidhan Sabha 2019 : हरलेले काय भले करणार?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

निवडणूक आघाडीवर

  • नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
  • उल्हासनगर भाजपचे महापौर ‘राष्ट्रवादी’च्या प्रचारात
  • कोल्हापुरात संभाजी ब्रिगेडचा काँग्रेस-राष्ट्रवादीस पाठिंबा
  • यवतमाळमध्ये काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा रोड शो
  • नागपूरमध्ये भाजपची पर्यावरणाच्या मुद्द्याला बगल
  • भाजप-शिवसेनेची मुंबईत आज संयुक्त सभा
  • निवडणूक आयोगाकडून राज्यात मतदानाची तयारी पूर्ण

विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला. साताऱ्यातील सभेत त्यांनी छत्रपतींच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा निर्धार केला, तर सांस्कृतिकनगरी पुण्यामध्ये जनतेच्या लुटारूंची तुरुंगवारी सुरूच राहील असे सांगत, त्यांनी लोकमान्यांनी स्वराज्याचा नारा दिला आम्ही सुराज्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे सांगितले.

दुष्काळमुक्तीचा परळीत संकल्प
परळी वैजनाथ - एकीकडे भाजपची कार्यशक्ती, तर दुसरीकडे काँग्रेस आघाडीची स्वार्थ शक्ती आहे. जे थकलेले, हरलेले आहेत; ते तुमचे काय भले करणार, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जलजीवन मिशनअंतर्गत साडेतीन लाख कोटी रुपये खर्चून २०२२ पर्यंत घरोघरी पाणी पोचविणार आहोत. पाण्यासंदर्भात जगाच्या इतिहासात असे काम कधीच झाले नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. १७) येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे, भविष्यातील योजना, ३७० कलम आदी मुद्द्यांना स्पर्श केला. परळीत आगमन झाल्यानंतर मोदी यांनी श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले. ते म्हणाले, ‘‘बीडने गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असे मित्र दिले. येथे नेहमी कमळच फुलले असून, या वेळी तर नवीन रेकॉर्ड होईल, असा विश्वास विराट गर्दीकडे पाहून वाटत आहे. ही जनता मनाला जिंकून पक्षाला जिंकून देणार आहे. विरोधकांनी आपले कार्यकर्ते का सोडून जात आहेत, याचा विचार करावा.

पक्षातील वरिष्ठ व युवा कार्यकर्ते सोडून जात असल्याने विरोधक हताश झाले आहेत. काही जण तर थकलेपणाची जाहीर कबुली देत आहेत. विरोधक देशहिताच्या निर्णयाला विरोध करतात. देशाच्या भावनेविरोधात काम करणाऱ्यांना शिक्षा मिळणारच.’’ ‘‘आम्ही पाच वर्षांत गरिबांचा विचार करून घरोघरी स्वच्छतागृह, प्रत्येकाला घर, वीज, गॅसकनेक्‍शन आदी कामे केली.

शेतकरी सन्मान, पीकविमा, पेन्शन योजनेसह सुमारे चारशे योजनांचा थेट सामान्यांना लाभ होत आहे. या योजनांवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. हा सारा पैसा जनतेचा असून, तो जनतेसाठीच वापरला जात आहे. यापूर्वी योजनांच्या पैशांची चोरी होत असे; आता ती पूर्णपणे रोखली आहे. आता दलाली संपली असून, लुटणारे थेट जेलमध्ये जात आहेत,’’ असेही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले....
दुष्काळमुक्तीसाठी वॉटरग्रीड योजना
रस्त्यांच्या उभारणीवर कोट्यवधींचा खर्च
ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ उभारले
नगर-बीड-परळी लोहमार्ग पूर्ण करणारच
विरोधकांची विधाने शोभादायक नाहीत

अखंड हिंदुस्तानचा साताऱ्यात निर्धार
सातारा -
 भारतीय जनता पक्षाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आधीच आहेत. आता त्यांचा संपूर्ण परिवारही आमच्याबरोबर आहे. छत्रपतींचे संस्कार व परिवार या दोन्हींच्या संगमातून छत्रपतींच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्तान बनविण्यासाठी नवी ताकद व ऊर्जा मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. देश-विदेशांतील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या सर्वोत्कृष्ट १५ ठिकाणांमध्ये साताऱ्याचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगतानाच, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर कडाडून हल्ला केला.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले, विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत मोदी यांनी भाषणाला मराठीतून सुरवात केली. ते म्हणाले, ‘‘सातारा ही पराक्रमी लोकांची भूमी असून, ही संतांचीदेखील भूमी आहे. अपशिंगे मिलिटरी गाव तर राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी समर्पित आहे. येथील प्रत्येक घरात राष्ट्ररक्षक आहे. असे संस्कार जेथे आहेत, तेथे चुकीचे कसे सहन होईल? त्यामुळेच वीर जवानांच्या शौर्यावर जेव्हा संशय घेतला जातो, राफेल व ३७० कलम हटविल्याबद्दल टीका होते, तेव्हा सर्वांत जास्त दुःख साताऱ्याच्या भूमीला होते. काँग्रेस, राष्ट्रवादीला हीच जनभावना समजत नाही, त्यामुळेच मागील निवडणुकीत जनतेने त्यांना धडा शिकवला.’’ 

लष्कर मजबूत केले
ते म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे राष्ट्ररक्षेसाठी भूदल, नौदल उभारले, त्याचप्रमाणे आम्ही पाच वर्षांत सैन्याची ताकद वाढवून त्याचा जगातील ताकदवान देशांत समावेश केला आहे. महायुती महाराष्ट्राला आणखी महान बनविण्याच्या मिशनवर निघाली आहे. अशा स्थितीत आघाडीत अंतर्गत चढाओढीच्या गडबडी आहेत, ते काय महाराष्ट्राला महान बनविणार? सर्वांनी मिळवून मलई खाणे हा त्यांचा संस्कार आहे.’’ राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहनही मोदी यांनी केले.  

मोदी म्हणाले
- शरद पवारांनी मैदानातून पळ काढला
- सिंचनाची कामे युती सरकारनेच केली
- साताऱ्याची यात्रा माझ्यासाठी तीर्थयात्रेसारखी
- मराठा आरक्षण महायुतीने करून दाखविले
- ६० लाख मेट्रिक टन साखरेसाठी सहा हजार कोटी अनुदान
- शेतकऱ्यांबाबत योग्य विचाराचे काम महायुतीने केले
- इथेनॉलचा दहा टक्‍के वापर पेट्रोल, डिझेलमध्ये करणार

पुण्यातील सभेत सुराज्याचा नारा
पुणे -
 ‘लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा सिलसिला येथेच थांबणार नाही. या पूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे वसूल केल्याशिवाय हा सेवक शांत बसणार नाही,’’ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील जाहीर सभेत केला.

तसेच, लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य’ची घोषणा पुण्यात केली अन्‌ येथूनच आपणाला ‘सुराज्य’ घडवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 
पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी- चिंचवडमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी सहा वाजून १२ मिनिटांनी मोदींचे सभास्थानी आगमन झाले. मराठीतून भाषणाला सुरवात करीत सुमारे ३१ मिनिटे त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला. भाषणादरम्यान कलम ३७०च्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पुढे येऊन लवून नमस्कार केला, तर घोषणा देत, प्रतिसाद मागत सभेतील उपस्थितांना बोलते केले. पुण्याने भाजपला भरभरून दिले, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तर, पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरण करणार असून, पालखी महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच, ‘उडान’अतंर्गत पुण्यासह राज्यातील नऊ शहरे जोडली जात असून, आणखी काही मार्गांचा त्यात समावेश होणार आहे, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील बहुतांश सभांत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या मोदींनी त्यांच्याबद्दल या सभेत अक्षरही उच्चारले नाही.

मोदी म्हणाले, ‘नवे केंद्र सरकार पाच वर्षांसाठी निवडले आहे, त्याला अजून पाच महिनेही झाले नाहीत. या काळात नागरिक नव्या भारताचा अनुभव घेत आहेत. जम्मू- काश्‍मीर आणि लडाखचा विकास करताना ‘कलम ३७०’चा अडथळा होता, तो दूर करण्याची चर्चा खूप झाली. परंतु, त्याचे धाडस भाजप सरकारने दाखविले. त्याचे कारण भारतीयांनी बहुमताने दिलेला जनादेश हेच आहे.’’

‘भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटचाल करीत आहे. स्टार्टअप आणि कौशल्य विकासामुळे युवकांना प्रचंड संधी मिळणार आहेत, त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि नव्या भारताची वाटचाल सुलभ होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत खूप चांगल्या पद्धतीने विकासकामे सुरू केली आहेत,’’ असेही मोदी यांनी स्पष्ट केले. तर, ‘‘मतदान २१ ऑक्‍टोबर रोजी सोमवारी असल्यामुळे रविवारच्या सुटीला जोडून बाहेर न जाता मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडा,’’ असे आवाहनही त्यांनी अखेरीस केले. 

या प्रसंगी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार अमर साबळे, संजय काकडे, आमदार दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, माजी खासदार अनिल शिरोळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, शहारध्यक्ष माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, सुनील कांबळे, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, लक्ष्मण जगताप आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

नेत्यांचे बोल
महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढण्याची क्षमता भाजपकडे नाही. ज्यांनी प्रश्‍न सोडविणे अपेक्षित आहे, तीच मंडळी विरोधकांना संपविण्याचे काम करत आहेत. कुस्ती नेहमी बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
नाशिक येथील सभेत

सावरकरांना भारतरत्न हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. बेरोजगारी, मंदीसारख्या विषयांवर इतरांनी बोलू नये म्हणून केलेला हा केवळ चुनावी जुमला आहे. सावरकरांना भारतरत्न देणे हा हुतात्मा भगतसिंग यांचा अवमान आहे.
- कन्हैयाकुमार, ‘जेएनयू’तील माजी विद्यार्थी नेते
नगर येथील सभेत

बीड जिल्ह्यातील परळी या मतदारसंघात काही खरे नाही अशा प्रकारची अफवा सर्वत्र पसरविली जात आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ने आत्तापर्यंत जातीपातीचेच राजकारण केले आहे.
- पंकजा मुंडे, भाजप नेत्या
पाथर्डी येथील सभेत

राष्ट्रवादी काँग्रेसने मला विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिली होती. ‘राष्ट्रवादी’चे काही नेते उमेदवारी फॉर्म घेऊन माझ्या घरी आले होते. माझ्यावर अन्याय झाला हे खरे असून, याबाबत मी पक्षाकडे विचारणाही करणार आहे.
- एकनाथ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते
भुसावळ येथील सभेत

राज्यातील जनतेने या दळभद्री, गैरव्यवहार करणाऱ्या सरकारला बाजूला सारायला हवे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर तीन महिन्यांमध्ये आम्ही सातबारा कोरा करू.
- अजित पवार, ‘राष्ट्रवादी’चे नेते
सोलापूर येथील सभेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 narendra modi speech politics